EX MLA Babajani Durani Met MLA Suresh Dhas News Sarkarnama
मराठवाडा

Babajani Durani Met MLA Suresh Dhas : चोहोबाजूंनी कोंडी झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी सुरेश धस यांना भेटले!

Former NCP MLA Babajani Durrani meets BJP MLA Suresh Dhas. Read more about their meeting and political discussions. : दुर्राणी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे अजित पवार यांनी परभणी जिल्ह्यात त्यांना शह देत राजेश विटेकर, विजय भांबळे यांच्या रूपाने तरुण नेतृत्व निर्माण केले.

Jagdish Pansare

Parbhani News : राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे सध्या चांगलेत चर्चेत आहेत. गेल्या आठवड्यात पाथरीमध्ये नगर परिषदेतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवसेना शिंदे गटाच्या माजी पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी दुर्राणी व त्यांच्या समर्थकांवर एकापाठोपाठ एक असे दोन गुन्हे नोंद झाले आहेत. पाथरी तालुक्यातच दुर्राणी यांची चोहोबाजूने कोंडी होत असताना अचानक काल त्यांनी आपला मोर्चा आष्टी कडे वळवला.

भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली. दुर्राणी यांनी धस यांची भेट नेमकी कशासाठी घेतली? हे अद्याप गुलदस्तात असले तरी ही भेट राजकीय नव्हती, असे म्हणण्याचे कारण नाही. गेल्या काही वर्षांपासून बाबाजानी दुर्राणी पाथरी आणि परभणी जिल्ह्याच्या राजकारणातून काहीसे दूर फेकले गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंड असताना तत्कालीन नेते अजित पवार यांच्याशी दुर्राणी यांचे संबंध तितके चांगले नव्हते.

दुर्राणी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे अजित पवार यांनी परभणी जिल्ह्यात त्यांना शह देत राजेश विटेकर, विजय भांबळे यांच्या रूपाने तरुण नेतृत्व निर्माण केले. तेव्हापासून दुर्राणी (Babajani Durani) पक्षात नाराज होते. मात्र शरद पवारांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिल्यामुळे ते पक्षात थांबले होते. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना पाथरीच्या विकास कामांसाठी निधी मिळत नाही, अशी ओरड दुर्राणी आणि त्यांच्या समर्थकांनी केली होती.

पाथरीमध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे उघड चित्र होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि पक्षाचे दोन तुकडे झाले. यावेळी दुर्राणी यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणे पसंत केले. मात्र काही महिन्यातच परभणी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी आपण अजित पवारांसोबत जात असल्याचे जाहीर करत दुर्राणी यांनी शरद पवारांची साथ सोडली. मात्र दुर्राणी यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा फारसा फायदा झाला नाही.

विधान परिषदेवर अजित पवारांनी त्यांच्याऐवजी राजेश विटेकर यांना संधी दिली. त्यामुळे नाराज असलेल्या बाबाजानी दुर्राणी यांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेत त्यांच्या पक्षात घरवापसी केली. गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेतील शॉपिंग कॉम्प्लेक्स घोटाळ्यावरून बाबाजानी दुर्राणी यांना महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून टारगेट केले जात होते. याचा भडका गेल्या आठवड्यात नगरपरिषदेतील विकास कामांच्या आढावा बैठकीत उडाला.

बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या समर्थकांनी बैठक संपल्यानंतर शिवसेना सिंधी गटाचे पदाधिकारी अलोक चौधरी यांना प्रवेशद्वारावर गाठत बेदम मारहाण केली. याप्रकरणी दुर्राणी आणि त्यांच्या काही समर्थकांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला होता. ही घटना ताजी असतानाच नगरपरिषदेतील एका कर्मचाऱ्याला आठ ते दहा जणांनी मिळून मारहाण केल्याप्रकरणी पुन्हा एकदा बाबाजानी आणि त्यांच्या समर्थकांवर दुसरा गुन्हा नोंद झाला.

एकूणच परभणी जिल्हा आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात बाबाजानी दुर्राणी यांची कोंडी होताना दिसत आहे. अशा वेळी सध्या राज्यभरात गाजत असलेल्या भाजपा आमदार सुरेश धस यांची दुर्राणी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरत आहे. या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप समोर आले नसले तरी बाबाजानी दुर्रानी हे काही वेगळा राजकीय निर्णय घेऊ पाहत आहेत का? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT