Chhatrapati Sambhaji Nagar Zilla Parishad election 2026: Sarkarnama
मराठवाडा

ZP News : जलजीवनचे काम फक्त कागदावर, प्रत्यक्षात नळही नाही, जलही नाही; झेडपी अध्यक्षांनीच दिली कबुली!

Har Ghar Jal scheme News : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी नुकताच या योजनेचा आढावा घेतला. यातून समोर आलेल्या माहिती आणि आकडेवारीतून जिल्ह्यातील नऊ तालुक्यात ही योजना केवळ कागदावरच झाली असल्याची कबुली नवनिर्वाचित अध्यक्षांनी दिली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनापैकी एक असलेल्या 'हर घर नल, हर घर जल' या योजनेचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी नुकताच या योजनेचा आढावा घेतला. यातून समोर आलेल्या माहिती आणि आकडेवारीतून जिल्ह्यातील नऊ तालुक्यात ही योजना केवळ कागदावरच झाली असल्याची कबुली नवनिर्वाचित अध्यक्षांनी दिली.

'ना नल, ना जल' अशी परिस्थिती बहुतांश तालुक्यात आहे. पाईप टाकले तर नळ नाही, नळ आहे तर पाईप नाही, असे प्रकार समोर आले आहेत. जलजीवनचे काम जिल्ह्यात केवळ कागदावर झाले आहे, त्याचा क्रमही चुकला आहे. जी कामे आधी करायला हवी होती ती नंतर करण्यात आली आहेत, त्यामुळे या सगळ्या योजनेच्या कामाची चौकशी करणार असल्याचे गलांडे यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले.

जिल्हा परिषदेत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध समित्यांचे सभापती याच पक्षाचे आहेत. अविनाश गलांडे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जलजीवन मिशन योजने संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

कागदोपत्री सगळ्या तालुक्यांमध्ये योजनेचे बहुतांश काम झाल्याचे दाखवण्यात आले आहे. हे पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष गलांडे यांना धक्काच बसला. कारण अनेक ठिकाणी अद्याप पाईपलाईन, नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही. ना नळ, ना जल असे चित्र सर्वत्र असताना अधिकाऱ्यांनी मात्र योजना पूर्ण झाल्याचा केलेला दावा हास्यास्पद असल्याचे गलांडे यांनी सांगितले.

दरडोई 55 लिटर नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याची ही योजना आहे. विशेष म्हणजे ही योजना ज्या गावात दिली जाईल तिथे इतर कुठल्या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये. अशा वेळी केवळ कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचे दाखवून अधिकारी दिशाभूल करत आहेत. जिल्ह्यात 4 लाख 80 हजार नळ जोडण्या या योजने अंतर्गत दिल्याचे कागदावर दाखण्यात आले आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे.

जिल्हा परिषदेत चार वर्ष प्रशासक राज होता, त्या काळात लोकप्रतिनिधी किंवा जिल्हा परिषदेतील बाॅडी अस्तित्वात नसल्याने प्रशासनावर कोणाचाही अंकुश नव्हता. मात्र आता जिल्हा परिषदेत जनतेने निवडून दिलेले सदस्य आहेत. जलजीवन मिशन योजनेतील असंख्य तक्रारी पाहता आज तातडीने संबंधित अधिकारी, सीईओ यांच्यासोबत बैठक घेतली. कागदावर काम पूर्ण झाल्याचे दाखवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल. तसेच या योजनेला गती देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अविनाश गलांडे यांनी म्हटले आहे.

जलजीवन मिशनचे वाजले बारा, योजनेत घोटाळा ?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या 1164 योजनांना मान्यता देण्यात आली असून ७०२ योजना पूर्ण दाखवण्यात आल्या असून 9 तालुक्यात कागदावर कामे दाखवले मात्र प्रत्यक्षात कामे शून्य आणि निकृष्ट असल्याची माहिती समोर आली,योजना पूर्ण दाखवल्या मात्र योजनेत फक्त नळ लावले प्रत्यक्षात त्यातून पाणी येत नाही, पैसे उचलले असून जनतेला याचा फायदा झाला नसून स्वत: जलजीवन मिशनच्या योजनेत चुकीचे कामे झाले असून कारवाई आणि सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT