Baburao Kadam Kohlikar  sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha Constituency : अपेक्षा नसताना लोकसभेची उमेदवारी; बाबुराव कदम-कोहळीकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Jagdish Pansare

Hingoli Political News: अपेक्षेप्रमाणे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आधी जाहीर झालेली हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हेमंत पाटील यांना निर्णयाची कल्पना देऊन बाबुराव कदम कोहळीकर या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम केलेल्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी दिल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे.

आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षाच नव्हती, आपण पक्षाकडे उमेदवारीही मागितली नव्हती. पण एकनाथभाईंनी (Eknath Shinde) माझ्यासारख्या गरीब शेतकरी कुटुंबातल्या सामान्य शिवसैनिकांवर ही मोठी जबाबदारी टाकली आहे, अशी प्रतिक्रिया बाबुराव कोहळीकर यांनी दिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. माझे नाव पहिल्या क्रमांकावर होते. पण तेव्हा मला उमेदवारी नाकारण्यात आली.

पण आज मुख्यमंत्री शिंदे यांनी मला लोकसभेची उमेदवारी दिल्याचे सांगत बाबुराव यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. हेमंत पाटील यांच्याबद्दल जनतेच्या मनात नाराजी आहे. त्यांची उमेदवारी बदला किंवा जागा भाजपला सोडा, अशी मागणी भाजपच्या जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावून धरली होती.

हेमंत पाटील यांना होणारा वाढता विरोध पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली. गेल्या चार दिवसापासून त्यांच्या नावाची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. अखेर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कोहळीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

लोकसभेची निवडणूक लढवणे ही मोठी जबाबदारी आहे पण मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास त्याला मी तडा जाऊ देणार नाही. निवडून आल्यानंतर जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटेन, अशी ग्वाही कोहळीकर यांनी दिली.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT