Yogi sham Bharati Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha Constituency : हेमंत पाटलांना अपशकुन, आता भाजपचे योगी शाम भारती अपक्ष लढणार..?

सरकारनामा ब्यूरो

संदीप नागरे

Hingoli Loksabha Constituency : दोन महिन्यांपूर्वी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्यावर लोक नाराज आहेत, त्यांना उमेदवारी देऊ नका, असे जाहीर आवाहन भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगी शाम भारती महाराज यांनी केले होते. त्यानंतरही हिंगोली लोकसभेची (Hingoli Loksabha) जागा शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे राखत हेमंत पाटील यांनाच उमेदवारी दिली. त्यानंतर जिल्ह्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात हेमंत पाटील यांची उमेदवारी बदला, वेळ पडली तर भाजपचा उमेदवार धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढायला तयार आहे, अशी आक्रमक भूमिका घेत परभणीत आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती.

मुंबईत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच योगी शाम भारती यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून (Hingoli Loksabha Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करत बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी योगी यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेत भाजपने हिंगोलीची जागा आपल्याकडे घेतली नाही आणि कोणी हेमंत पाटील यांच्या विरोधात लढण्याची हिंमत दाखवली नाही तर मी स्वतः अपक्ष उभा राहीन, असे जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माहूर गडाचे (Mahur Gadh) महंत असलेल्या योगी शाम भारती महाराज यांनी हेमंत पाटील माझ्यासारख्या व्यक्तीचा फोन उचलत नाही, त्यांनी जनतेची कोणतीच कामे केली नाहीत, असा आरोप करत त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. आज हिंगोलीत (Hingoli) समर्थकांसह दाखल होऊन ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मागील दोन निवडणुकांपासून लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या शाम भारती महाराजांना भाजपकडून (BJP) तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी आता बंड पुकारले आहे.

दोन महिन्यापूर्वी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर जनता नाराज असल्याची जाहीर टीका भारती यांनी केली होती. याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघांचेही समर्थक एकमेकांवर तुटून पडले होते. जिल्ह्यातील विकासकामांच्या श्रेयवादावरूनही हिंगोलीचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mulkute) आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात खटके उडाले होते.

पैनगंगा नदीवरील धानोडा आणि इतर ठिकाणच्या उच्च पातळी बंधाऱ्याच्या मान्यतेवरून आमदार आणि खासदार यांनी आपणच ही कामे मंजूर करून आणल्याचा दावा माध्यमांकडे स्वतंत्रपणे केला होता. या श्रेयवादातून काही काळ या दोघांमधील संबंध ताणले गेले होते. नेत्यांमध्येच जमत नसेल तर स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बाबतीत वेगळी परिस्थिती कशी असेल, अशी चर्चा सुरू आहे. त्यात शाम भारती महाराजांनी तर आता थेट हेमंत पाटलांविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT