Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : माझा विनायक मेटे करण्याची चर्चा : अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले...

हे जे कोणी करत आहेत, त्यांना एवढंच सांगायचं आहे की अशोक चव्हाणंचा जीव गेला तरी हरकत नाही.

सरकारनामा ब्यूरो

नांदेड : माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) कुठे जातात. कुणाला भेटतात. चर्चा अशीही सुरू आहे की अशोक चव्हाण यांचाही विनायक मेटे (Vinayak Mete) करा. यालाही मेटेसारखं करून टाक. हे जे कोणी करत आहेत, त्यांना एवढंच सांगायचं आहे की अशोक चव्हाणंचा जीव गेला तरी हरकत नाही. अशोक चव्हाण तुमच्यासारखं डुप्लिकेट, खोटं बोलून नेतृत्व करणाऱ्यांपैकी नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या विरोधकांना दिला. (I am being watched : Ashok Chavan)

सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही शासकीय पत्रे अज्ञातांनी मिळवली. त्या पत्रांतील सही कायम ठेवून मूळ मजकूर खोडून कोरी लेटरहेड तयार केली. असे एक लेटरहेड यापूर्वी मिळाले होते. त्यामुळे या प्रकाराची कुणकूण लागली होती. त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलिस चौकशीही सुरू झाली आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर अशाच बनावट लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्यावर चव्हाण यांनी आज तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली.

चव्हाण म्हणाले की मंत्रिपदाच्या काळातील लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञातांनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केल्याची तक्रार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पोलिसांत केली आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न आहे. पण, तुम्हाला जे काही करायचं ते करा ना. काय बोलायचं आणि बोलायचं नाही, ते तुमच्या बहिणीला सांगा ना. आम्हाला काय सांगता. आमचं काहीही म्हणणं नाही. मला हा उल्लेख करण्याची गरज नव्हती. पण माझ्यावर हा प्रसंग आणला गेला आहे, त्यामुळे मला बोलावं लागलं.

माझ्या नावचं खोटं लेटरहेड तयार करून त्यातील मधला मजकूर काढून टाकलेला. खाली माझी सही ठेवलेली. मधल्या भागात मराठा समाजात संभ्रम निर्माण करायचा. अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहे. हे दाखवून देण्यासाठी बोगस पत्र तयार केली जात आहेत. त्याविरोधात तक्रार दिली असून त्यामागील सूत्रधार शोधण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे मी केली आहे, असेही चव्हाण म्हणाले

एवढेच नव्हे तर मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. संबंधित व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठी, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असाही गंभीर संशय चव्हाण यांनी या तक्रारीत व्यक्त केला आहे.

आगामी काळात अनेक निवडणुका असून राजकीयदृष्ट्या प्रतिमाहनन करण्यासाठी, जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तावेज तयार केले असावेत. बनावट पत्रे तयार करून सामाजिक शांतता तसेच कायदा, सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. या प्रकाराचे गांभीर्य, त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT