Imtiaz Jalil
Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : 'आय जे' महोत्सवातून इम्तियाज जलील करणार लोकसभा निवडणुकीसाठी 'पीच' तयार!

जगदीश पानसरे :सरकारनामा

Loksabha elections : छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारपासून पुढील दोन आठवडे शहरातील आमखास मैदानावर इम्तियाज यांच्या नावाने 'आय जे'फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार झाल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या नावाने भरवण्यात येणाऱ्या या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी चार महिने शिल्लक असताना दुसऱ्यांदा दिल्ली गाठण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel) पीच तयार करत असल्याचे बोलले जाते. गेल्या तीन-चार महिन्यापासून या फेस्टिवलची तयारी इम्तियाज जलील व त्यांचा मुलगा बिलाल हे करत होते. गेल्या वर्षी या फेस्टिवलला राज्यातील सर्वच पक्षीय आमदार,खासदार, मंत्र्यांनी हजेरी लावली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) हे इम्तियाज जलील यांचे मित्र असल्यामुळे त्यांनी आवर्जून या महोत्सवाला भेट दिली होती. एवढेच नाही तर आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही दिले होते.अर्थात दुसरा महोत्सव आला तरीही या स्टेडियमचा कागद हललेला नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज यांनी चमत्कार घडवत एमआयएमला महाराष्ट्रातील पहिला खासदार मिळवून दिला.मात्र गेल्या साडेचार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यासाठी येणारी लोकसभा निवडणूक आव्हानात्मक असणार आहे.

दुसऱ्या 'आय जे,फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांनी तयारी सुरू केली असून स्पोर्ट, फूड आणि इंटरटेनमेंटवर आधारित या महोत्सवात मुशायरा, क्रिकेट व फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

आयपीएलच्या धर्तीवर संघ निवडण्यात आले आहेत. मराठवाड्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा या महोत्सवाच्या आयोजनामागे हेतू असल्याचे इम्तियाज जलील सांगतात. आता दोन आठवडे चालणाऱ्या या महोत्सवात कोणकोणत्या राजकीय पक्षांचे नेते, मंत्री हजेरी लावतात याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT