Heavy Rain Fund Scam News Sarkarnama
मराठवाडा

Jalna News : कारवाईचा फास आवळला; अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात तलाठ्यासह महसूलच्या 28 कर्मचाऱ्यांवर गुन्हे!

A case has been registered against 28 revenue department officials in Jalna over the heavy rain subsidy distribution scam. : जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीत शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात 79 कोटींपैकी तब्बल 42 कोटींचा अपहार उघडकीस आला.

Jagdish Pansare

Marathwada Politics : मराठवाड्यासह राज्यात पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः बीड, नांदडे, लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती, जनावरे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अकराहून अधिक बळी या पावसाने मराठवाड्यात घेतले आहेत. एकीकडे अतिवृष्टीमुळे असा तडाखा बसत असतांना जालना जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात कारवाईचा फास आवळला जात आहे. या घोटाळा प्रकरणी या पुर्वी काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

त्यानंतर आता तलाठी, संगणक चालक यांच्यासह 28 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. (Jalna) जिल्ह्यासह राज्यभरात सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या अतिवृष्टी अनुदान वाटप गैरव्यवहारप्रकरणी महसूल विभागाच्या या कर्मचाऱ्यांवर मंगळवारी रात्री अंबड पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये तलाठी, संगणक ऑपरेटर व नेटवर्क इंजिनिअर यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीत शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात 79 कोटींपैकी तब्बल 42 कोटींचा अपहार उघडकीस आला. तलाठ्यांसह महसूलचे कर्मचारी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक असे एकूण 76 अधिकारी व कर्मचारी या प्रकरणात दोषी आढळून आले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल (Fir Filed) करावे म्हणून विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा गाजला.

दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी देखील संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सहायक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अखेर रात्री उशिरापर्यंत तलाठ्यांसह महसूलच्या 28 कर्मचाऱ्यांवर अंबड पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर आणखी काही दोषींवर गुन्हे दाखल होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तहसिलदार, कृषी सहायक, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करण्यात आली होती.

महसूल विभागाच्या ज्या 28 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यात गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवनसिंग सुलाने, शिवाजी ढालके, कल्याणसिंग बमनावत, सुनील सोरमारे, मोहित गोषिक, चंद्रकांत खिल्लारे, रामेश्वर जाधव, डिगंबर कुरेवाड, किरण जाधव, रमेश कांबळे, सुकन्या गवते, कृष्णा मुजगुले, विजय जोगदंड, श्रीनिवास जाधव, विनोद ठाकरे, प्रवीण शिनगारे, बप्पासाहेब भुसारे, सूरज बिक्कड, सुशील जाधव, वैभव आडगावकर, विजय भांडवले, रामेश्वर बारहाते, आशिष पैठणकर, दिनेश बेराड यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT