Rajabhau Deshmukh  sarkarnama
मराठवाडा

Jalna Lok Sabha constituency: राजाभाऊ देशमुख पुन्हा घरात खासदारकी खेचून आणतील का ?

Jalna Political News : राजाभाऊ देशमुख यांच्याकडे सलग पाचवेळा निवडून आलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात योग्य पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

Tushar Patil

Lok Sabha Election 2024 : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या होम पिचवर भोकरदन शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून आव्हान देणारे व गेल्या 15 वर्षांपासून नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे लोकसभेसाठी जालना मतदारसंघातून इच्छुक आहेत. शांत स्वभाव पण तितकेच चाणाक्ष राजकारणी म्हणून राजाभाऊ ओळखले जातात. रावसाहेब दानवे यांचे विरोधक म्हणून सध्या त्यांची भोकरदन विधानसभा मतदारसंघात ओळख आहे. गेल्या दोन टर्मपासून जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उमेदवार देण्यात येत होता. मात्र, यावेळी जालना जिल्ह्यातील उमेदवार देण्याचे ठरल्यास राजाभाऊ देशमुख यांच्या नावावर महाविकास आघाडीत एकमत होऊ शकते.

राजाभाऊ यांना वडील कै. भाऊसाहेब देशमुख यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत 1952-57 दरम्यान ते भोकरदनचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले. 1962 ते 1971 दरम्यान ते खासदार होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांचे योगदान होते. त्यामुळे देशमुख यांच्या घरात पहिल्यापासूनच राजकारणाचे वातावरण आहे. नगर परिषदेतून आपल्या राजकारणाला सुरुवात केलेले राजाभाऊ देशमुख यांच्याकडे सलग पाचवेळा निवडून आलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात योग्य पर्याय म्हणून पाहिले जात आहे. आता वडिलांनंतर राजाभाऊ जालना लोकसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा घरात खासदारकी आणतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नाव (Name)

राजेंद्र (राजाभाऊ) भाऊसाहेब देशमुख

जन्मतारीख (Birth date)

11 ऑगस्ट 1959

शिक्षण (Education)

पदवीधर, वाणिज्य शाखा

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

राजाभाऊ देशमुख यांचे वडील कै. भाऊसाहेब देशमुख हे भोकरदनचे 1952 ते 57 पहिले आमदार होते. त्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे ते 1962 ते 1971 सलग दहा वर्षे खासदार होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. हैदराबाद येथे महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृह सुरू केले व मोफत जेवणाची व्यवस्थाही केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधू अॅड. वसंतराव देशमुख हे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य होते तर लहान बंधू अमृत देशमुख हे उद्योजक आहेत. जालना जिल्हा सीड्स असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. तसेच ते लायन्स क्लब भोकरदनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. देशमुख यांच्या पत्नी मंजुषा देशमुख या सलग पाच वर्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या. महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराण्यांशी त्यांचे नातेसंबंध आहेत. राजाभाऊ देशमुख यांचा मुलगा इंद्रजीत याने बंगळुरू येथील नामांकित विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. त्यांनी पुण्यात एक स्टार्टअप सुरू केले असून भोकरदन व सिल्लोड येथील देशमुख यांच्या जनविकास शिक्षण संस्थेचे पूर्ण व्यवस्थापनाचे काम ते बघतात. राजकारणापासून ते सध्यातरी अलिप्त आहे. मुलगी श्रावणी देशमुख ही विवाहित असून ती भोकरदन तालुक्यातील पहिली लेखापरीक्षक आहे. तिचे सासर अहमदनगर येथील असून ती पुणे येथे एका नामांकित कंपनी त लेखापरीक्षणाचे काम करते. देशमुख यांचे पुतणे प्रतीक व क्षीतिज हे उद्योग व्यवसायात असून त्यांचे मल्टिनॅशनल कंपन्यांचे जाळे जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पसरलेले आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेती व व्यापार

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

जालना

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

काँग्रेस

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

1995 ला नगरपरिषदेच्या निवडणुकीपासून राजाभाऊ देशमुख यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पहिल्या नगरसेवकपदाच्या निवडणुकीत ते अपक्ष उभे राहिले होते. त्यांचा निसटता पराभव झाला. नंतर ते नगर परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाले. 1998 ला ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष झाले. सलग पाच वर्षे त्यांनी तालुकाध्यक्षपद भूषवले. त्यावेळी त्यांनी मतदारसंघात काँग्रेसचे पाच जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. 2007 ला तत्कालीन राष्ट्रवादीचे पालकमंत्री व दिग्गज नेते राजेश टोपे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व राष्ट्रवादीकडून नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहिले.

त्यावेळी काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांचे मेव्हणे शालक (पत्नीचे भाऊ) यांचा त्यांनी पराभूत करून नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणली. ते पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. 2011 मध्ये पुन्हा नगरपरिषदेची सत्ता त्यांनी हस्तगत केली. तेव्हा अडीच वर्ष ते उपनगराध्यक्ष होते. 2016 मध्ये त्यांनी मुंबई येथे माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 च्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी मंजुषा देशमुख काँग्रेसकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्या व नगरपरिषदेवर त्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावला. 2017 ते 2019 ते काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष होते. 2019 पासून आजतागायत ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

भोकरदन शहरात त्यांनी 2001 मध्ये पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. साठ विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या त्यांच्या शिक्षणसंस्थेचे जाळे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय असे विस्तारले आहे. भोकरदन तालुक्यातील नावाजलेली व प्रतिष्ठित शिक्षण संस्था म्हणून त्यांच्या जनविकास शिक्षण संस्थेचा उल्लेख केला जातो. अडीच हजार विद्यार्थी व जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांचा गोतावळा ते सांभाळतात. 2003 मध्ये गणपती नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आज या पतसंस्थेचा विस्तार भोकरदन तालुक्यातील राजूर, हसनाबाद या गावांत देखील आहे.

2012 आणि 2018 च्या दुष्काळात त्यांनी शहरवासियांना मोफत पाणीवाटप केले. कोविड काळात त्यांनी संपूर्ण भोकरदन शहरात अन्नधान्य व किराणा किटचे वाटप केले. कोविड काळात परराज्यातील मजुरांना जिल्हा सरहद्दीपर्यंत बसने मोफत जाण्याची व्यवस्था केली. दरवर्षी शहरवासीयांना ते दिवाळी भेट देत असतात. जालना शहरात मुलींच्या वसतीगृहासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतही त्यांनी केली आहे. भाऊबीजेनिमित्त शहरातील महिलांना साडी भेट तसे ईदनिमित्त गरजूंना मदतही केली जाते. मतदारसंघातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून मोफत ऑपरेशनची व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. क्रिकेट स्पर्धा, कुस्त्यांचे आखाडे, हरिनाम सप्ताह, कीर्तन सोहळे यासाठी ते नेहमी आर्थिक मदत करत असतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

निवडणूक लढवली नव्हती

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

निवडणूक लढवली नव्हती

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

गेल्या काही वर्षांत राजाभाऊ देशमुख यांचा जनसंपर्क भोकरदन शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात वाढला आहे. जालना जिल्हाध्यक्ष झाल्यापासून जिल्ह्यातही त्यांचा संपर्क वाढला. राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबध आहेत. जिल्हा पातळीवर महत्वाचे निर्णय घेताना जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या मताला महत्व दिले जाते. सामाजिक कार्यक्रम, कीर्तन सोहळे, क्रिकेट स्पर्धा व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात काही वर्षांत जनसंपर्क वाढवला आहे. फोनवर ते सहज उपलब्ध असतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे प्रखर राजकीय विरोधक अशी राजाभाऊ देशमुख यांची ओळख असून अनेक सभा व राजकीय भाषणांतून त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर उघडपणे टीका केलेली आहे. वैयक्तिक टीका किंवा प्रक्षोभक, चर्चेत येण्यासाठीची विधाने देशमुख यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात केलेली नाही. भोकरदन शहर, जालना जिल्ह्यातील विकासकामांच्या प्रश्नांवर तसेच राज्य आणि केंद्राच्या चुकीच्या धोरणांविरोधात राजाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोठी राजकीय आंदोलने झाली आहेत.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सोशल मीडियावर ते सक्रिय आहेत, पक्षाची ध्येय धोरणं, सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयीचे मत ते सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. हे हाताळण्यासाठी त्यांनी स्वतंत्र टीमही नियुक्त केलेली आहे. काँग्रेस पक्षाचा सोशल मीडिया सेल मतदार संघात बऱ्यापैकी सक्रिय आहे. विविध राजकीय नेत्यांच्या जयंती, वाढदिवस याचे शुभेच्छा संदेश ते पाठवत असतात. शिवाय मतदार संघातील कार्यक्रम, शहरातील विकास कामांचे उद्घाटन यासाठी त्यांचे शहरातील कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

जालना लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. महाविकास आघाडीमध्ये सर्वानुमते काँग्रेसकडून नवीन चेहरा द्यायचे ठरल्यास राजाभाऊ देशमुख यांचा विचार होऊ शकतो. राजकीय अनुभव आणि स्वच्छ चेहरा यामुळे त्यांना पक्षातूनही विरोध होण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला नसणारा भाव, मराठा आरक्षण प्रश्न व काँग्रेसचा पारंपरिक मतदार या मुद्द्यांवर महाविकास आघाडीकडून ते भाजपला आव्हान देऊ शकतात, असे चित्र आहे. जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा सातत्याने पराभव होत आला असला तरी काँग्रेसचे मतदार आणि त्यांचे मतदान पक्षाच्या पाठीशी कायम आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीचा एकत्रित परिणाम झाला तर राजाभाऊ देशमुख यांच्या रुपाने जालन्यात धक्कादायक निकाल लागू शकतो.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

राजाभाऊ देशमुख यांचा भोकरदन शहर वगळता ग्रामीण भागात याआधी पुरेसा संपर्क नव्हता. त्यांच्याकडे ग्रामीण भागात बूथ स्तरावर काम करणारी पुरेशी यंत्रणा नाही. शिवाय संघटनात्मक बळ असणारी कार्यकर्त्यांची फळी नाही. महाविकास आघाडीतील जालना जिल्ह्यातील नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे संघटना कमकुवत झालेली आहे. मतदारसंघातील दानवेविरोधी सर्व गटांना एकत्र आणणे हे देशमुख यांच्यासमोरचे मोठे आव्हान असेल.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

उमेदवारी जरी नाही मिळाली तरी देशमुख बंडखोरी करणार नाहीत. याआधी देखील त्यांनी काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या प्रत्येक उमेदवाराला शहरातून मताधिक्य मिळवून दिलेले आहे. पक्षाने ही निवडणूक गांभीर्याने लढवण्याचा निर्णय घेतला तर राजाभाऊ देशमुख यांना उमेदवारीचा निर्णय होऊ शकतो. पक्षातून याआधी जालना लोकसभा मतदारसंघातून लढलेले माजी आमदार कल्याण काळे हेही इच्छुक आहेत. या दोघापैंकी एकाला उमेदवारी मिळणार आहे, दोघांमध्ये चांगला समन्वय असल्याने बंडखोरीची शक्यता नाहीच.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT