Jalna Political News : जालना काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरोशायरीतून आपण काँग्रेस पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत दिले होते. जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे हे आपल्या भेटीसाठी येणार आहे, असे सांगत कैलास गोरंट्याल यांनी थेट भाजप प्रवेशावर भाष्य टाळले होते. मात्र कल्याण काळे यांनी गोरंट्याल यांची भेट घेतलीच नाही. त्यामुळे आधीच काँग्रेस पक्षावर आणि नेत्यांवर नाराज असलेल्या गोरंट्याल यांनी आज त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचा उद्या मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होत आहे. परंतु त्यांच्यासोबतच गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांचाही प्रवेश करून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र गोरंट्याल याला तयार नाहीत. वरपूडकर यांच्यासोबत एकत्रित प्रवेश नको, अशी भूमिका घेत मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला पक्षप्रवेश व्हावा, अशी इच्छा गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो. (Kalyan Kale) आतापर्यंत नगर परिषदेच्या माध्यमातून कैलास गोरंट्याल यांनी जालना शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली होती. परंतु 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला वाऱ्यावर सोडले, वरिष्ठ नेत्यांना सभा मागूनही त्या दिल्या नाहीत त्यामुळे आपला पराभव झाला, असे म्हणत गोरंट्याल यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
जालना लोकसभा मतदारसंघातून कल्याण काळे निवडून आल्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभातही कैलास गोरंट्याल यांनी काळे यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. विधानसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याकडे पाठ फिरवल्यामुळेच पराभव झाला, तुम्हीही आता सावधपणे पाऊल टाका असा सल्ला गोरंट्याल यांनी दिला होता. गेल्या काही महिन्यांपासून गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी असलेल्या मैत्रीतून ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज वर्तवला जात होता.
दरम्यान भाजपचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांच्या मार्फतही त्यांनी भाजपा प्रवेशासाठी प्रयत्न केले होते, असे बोलले जाते. परंतु जालना जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व टिकवायचे असेल तर रावसाहेब दानवे यांना बायपास करून पक्षप्रवेश करणे भविष्यात अडचणीचे ठरू शकते याचा अंदाज आल्यामुळे गोरंट्याल यांनी चव्हाण यांच्याऐवजी दानवे यांच्या मध्यस्थीने आपला प्रवेश निश्चित केल्याची चर्चा आहे. नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत करण्याला गोरंट्याल यांचा तीव्र विरोध होता. मात्र तो मोडून काढत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी देत महापालिकेचा निर्णय घेतला.
बबनराव लोणीकरांचीही घेतली भेट..
सुरुवातीला रावसाहेब दानवे यांनी कैलास गोरंट्याल यांच्या सुरात सूर मिसळत महापालिका करण्यास विरोध दर्शवला होता. परंतु राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे रावसाहेब दानवे यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे काही काळ कैलास गोरंट्याल हे रावसाहेब दानवे यांच्यावरही नाराज होते. परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी महापालिका निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्यासाठी कैलास गोरंट्याल यांनी दोन पावलं मागे येत रावसाहेब दानवे यांच्याशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी झालेल्या गुप्त बैठकीत कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला.
दरम्यान भाजपचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय वैर पाहता गोरंट्याल यांनी त्यांचीही नुकतीच भेट घेतल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील या दोन विरुद्ध दिशेला तोंड असलेल्या नेत्यांना खुष ठेवत आपला भाजपामधील प्रवेश सुकर करण्याचा गोरंट्याल यांचा प्रयत्न आहे. भाजपमधील प्रवेश निश्चित झाल्यानंतर तो स्वतंत्र आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनाने व्हावा, अशी इच्छा कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या उद्या मुंबईत होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यात आपला प्रवेश नको, अशी भूमिका गोरंट्याल यांनी घेतली. त्यामुळे कदाचित उद्या फक्त वरपूडकर यांचाच भाजपमध्ये प्रवेश होईल. कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशासाठी कुठला नवा मुहूर्त काढला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.