Dr. Pritam Munde, Karuna Sharma-Munde Sarkarnama
मराठवाडा

Beed Loksabha News : बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे; करुणा शर्मा-मुंडे पुन्हा अवतरल्या...

Shital Waghmare

Beed Loksabha News : लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तसा राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणाऱ्या त्यांच्या पत्नी करुणा शर्मा- मुंडे पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत बीडमधून भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी धाराशिव येथे केली. त्यामुळे बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.

देशामधील लोकशाही संकटात आहे. घराणेशाहीमुळे हुकूमशाही चालू आहे. गोपीनाथ मुंडे हे माझे सासरे होते. तरीही मी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बीड इथून प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लढवणार असल्याचे जनस्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांनी जाहीर केले. स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता नवनवीन लोकांना राजकारणात संधी देण्यासाठी करुणा मुंडे- शर्मा या सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

धाराशिव येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना बीडमधून लोकसभा लढवण्याची घोषणा केली. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भ्रष्टाचारी पक्ष एकत्र आल्याचे दिसून येते. आणि ते एकत्र येऊन जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार करीत आहेत. हे बघून मी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे. या पक्षाची मी नोंदणी केली असून, मला पक्षाचे नाव मिळाले आहे, लवकरच चिन्हही मिळेल. जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर खासगीकरण थांबवावे लागेल.

शेतकऱ्यांना न्याय द्यावा लागेल. आणि लोकांच्या योजना लोकांपर्यंत पोचवाव्या लागतील. मुलांना दर्जेदार आणि चांगले शिक्षण द्यावे लागेल. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ऊसतोड कामगारांच्या योजना या त्यांना मिळत नाही, असाही आरोप त्यांनी केला. नवीन लोकांनी राजकारणात येऊन पुढाकार घ्यावा लागेल, तरच काहीतरी बदल घडू शकेल. देशामध्ये लोकशाही संपली असून, हुकूमशाही चालू आहे. घराणेशाहीमुळे लोकांना संधी मिळत नाही.

हजारो कोटींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना घेऊन त्यांची मोठ्या पदावर नेमणूक केली जाते. त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना आज न्याय आणि संधी मिळत नाही. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढलेली आहे. पोलिस गुंडांना राजाश्रय देत आहेत. आपल्या महाराष्ट्राचा पूर्णपणे बिहार झालेला आहे. तो रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असेही करुणा शर्मा- मुंडे यांनी लोकसभा लढण्यामागे आपला हेतू असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका खुनी माणसाला वर्षात जामीन मंजूर होतो, परंतु एक महिला न्यायासाठी फिरत असेल तर तिला 15 ते 20 वर्षे खेट्या माराव्या लागतात. सध्या महाराष्ट्रमध्ये दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. जगामध्ये अनेक ठिकाणी निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या जातात, पण भारतामध्ये मात्र इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून घेतल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोटाळे होण्याची शक्यता आहे, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

येणाऱ्या लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. जनसुराज्य पक्षाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मशीन ठेवलेल्या असतील त्या ठिकाणी जॅमर बसवू, असा इशाराही करुणा मुंडे यांनी या वेळी दिला. तसेच ईव्हीएमच्या विरोधात आपण हायकोर्ट व सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या आहेत. येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात, अशी आमची आग्रही मागणी आहे. लोकसभेत भारतीय जनता पार्टीला निवडणुका जिंकता येतात. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप जिंकत नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT