Dhiraj Deshmkukh 
मराठवाडा

Latur DCC Bank: लातूर जिल्हा बँकेत महायुतीत फूट! धीरज देशमुखांचा दावा चोवीस तासांतच ठरला खरा

Latur DCC Bank : बाबासाहेब पाटील तन-मनाने आमच्यासोबतच आहेत, असा दावा काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी केला होता.

Jagdish Pansare

Latur DCC Bank : या दाव्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली होती. पण विशेष म्हणजे चोवीस तासांतच त्यांचा दावा खरा ठरला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण नको, म्हणत काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजेरी लावली. यावरून जिल्हा बँकेत महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून भाजपाचे माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर व राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबासाहेब पाटील यांच्यात कलगितुरा रंगला होता. दुष्काळामुळे जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकला, तोपर्यंत प्रशासक नेमा अशी मागणी करत बँकेतील काही सभासद न्यायालयात गेले होते.

परंतू सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या खात्यांतर्गत असलेल्या प्राधिकरणाने निवडणूक घेण्यास आमची यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. दरम्यानच्या काळात संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे काँग्रेसची साथ देत आहेत, त्यांना ते महायुतीचे मंत्री असल्याचा विसर पडला आहे. ते काँग्रेससोबत गेले तर आम्ही त्यांच्याविरोधात आक्रमकपणे लढू, असा इशारा निलंगेकर यांनी दिला होता.

यावरून बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी निलंगेकर यांना सोशल मिडियावर ट्रोल केले होते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा बँकेचा कारभार भ्रष्ट आहे, त्यांनी आपल्या संस्थांना कर्जपुरवठा केला, शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेच नाही, असे आरोप करत बँकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.

यावरून काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख यांनी निलंगेकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. चांगल्याला चांगल म्हटलं पाहिजे, तुमचे मुख्यमंत्री देखील लातूर जिल्हा बँकेचे कौतुक करतात, असा टोला लगावला होता. जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपाचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांच्या निवासस्थानी महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला. विशेष म्हणजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, संभाजी पाटील निलंगेकर हे या बैठकीला उपस्थित होते. दोन दिवसापासून शहरात महायुतीच्या विविध कार्यक्रमांमध्ये हे दोघे मांडीला मांडी लावून बसल्याचे चित्र होते. यावरून निलंगेकर-पाटील यांच्यात दिलजमाई झाली असे चित्र निर्माण झाले होते.

निलंगेकरांच्या भुमिकेकडे लक्ष?

काल माध्यमांना जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण आणणार नाही. जे चांगल आहे त्याच्यासोबत जाणार, असे स्पष्ट संकेत बाबासाहेब पाटील यांनी दिले होते. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणीमध्ये युती झाली का? असा सवाल करत आपण काँग्रेससोबतच जाणार हे त्यांनी अधोरेखित केले होते.

त्यानुसार आज धीरज देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पाटील स्वतः हजर राहिले. यावरून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बाबासाहेब पाटील यांची साथ महायुतीला नाही तर काँग्रेसला असणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावर आता संभाजी पाटील यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT