

Jalgaon Politics : मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा संजना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अनुपस्थितीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. आईच्या आजारपणामुळे मुक्ताईनगरला उपस्थित राहता येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आईला कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती त्यांनी दिली.
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कुठे आहेत ते दाखवा आणि 500 रुपये बक्षीस मिळवा असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले होते. गेल्यावर्षभरापासून नगराध्यक्षा नगरपालिकेत दिसलेल्या नाहीत असा आरोप खडसेंनी केला होता. नगराध्यक्षांनी त्यासंदर्भात जाहीर पत्रकार परिषद घेऊन त्या कुठे आहेत याचा खुलासा करायला हवा असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.
या मुद्द्यावरुन आमदार एकनाथ खडसे व चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली होती. मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात संजना पाटील यांच्या अनुपस्थितीवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. आपल्या मुलीच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर देताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा मुलगा निखिल खडसे यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थितीत केला. माझ्या मुलीविषयी का बोलत आहात? तुम्हालाही मुली आहेत, जरा भान ठेवा. मी कौटुंबिक वादात घुसलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा खडसेंना पाटील यांनी दिला.
नगरपंचायतीत माझ्या मुलीला मी निवडणुकीत उभं केलं कारण लोकांचा आग्रह होता. त्यामुळे मुलीचा नकार असनाही मी तिला निवडणुकीला उभं केलं. ती माझी चूक होती, जी माझ्या उशीरा लक्षात आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तर, नागरिक म्हणून नगराध्यक्षा कुठे आहेत हे विचारण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं खडसेंनी म्हटलं होतं.
दरम्यान, संजना पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुक्ताईनगर नगरपंचायतीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभा आटोपल्यानंतर, नगराध्यक्षा संजना पाटील यांनी माध्यमांसमोर येत खडसेंच्या आरोपांवर खुलासा केला. आपल्या आईला कॅन्सरचे निदान झाले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिच्या उपचारासाठी मला वेळोवेळी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे मला प्रत्यक्षात नगरपंचायतीत उपस्थितीत राहता येत नाही असा खुलासा करत नगराध्यक्षा संजना पाटील यांनी चर्चांना पूर्णविराम दिला.
परंतु मी सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करत असते. नगरपंचायतीचा विकास कुठेही थांबलेला नाही. आजही सर्वसाधारण सभेत २० विषयांना मंजूरी देण्यात आली आहे. भरपूर कामे सुरु असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.