Sudhakar Shrangare Sarkarnama
मराठवाडा

Latur Lok Sabha Constituency: लातूरमध्ये भाजप भाकरी फिरवणार, खासदार श्रृंगारेंना...

BJP News : मतदारसंघाशी संपर्क नाही, सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नाही यामुळे श्रृंगारे यांच्याबद्दल नाराजीचे वातावरण आहे.

Jagdish Pansare

Marathwada BJP News : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसा महायुतीतील जागावाटपांना वेग येत आहे. महायुतीतील तीनही पक्ष किती आणि कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप स्पष्ट नाही. असे असले तरी अनेक मतदारसंघांमध्ये धक्कादायक निर्णय घेतले जाऊ शकतात.त्यामध्ये मराठवाड्यातील लातूर लोकसभा मतदारसंघात भाजप भाकरी फिरवण्याची दाट शक्यता आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुधाकर श्रृंगारे हा नवा चेहरा देत धक्कातंत्राचा वापर केला. भाजपची जिल्ह्यात असलेली ताकद आणि मोदी लाट यात श्रृंगारे यांनी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात मोठा विजय मिळवला. मच्छिंद्र कामत यांचा श्रृंगारे यांनी तब्बल 2 लाख 90 हजार मतांनी पराभव केला होता.त्यांचा विजय जेवढा मोठा होता तेवढी छाप मात्र खासदार श्रृंगारे यांना साडेचार वर्षात मतदारसंघात पाडता आली नाही. मतदारसंघाशी संपर्क नाही, सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नाही यामुळे श्रृंगारे यांच्याबद्दल नाराजीचे वातावरण आहे.

शिवाय पुन्हा मतदारांसमोर जायचे तर सांगण्यासाठी ठोस विकासकामेही नाहीत, अशी अवस्था आहे. तरीही विद्यमान खासदार लातूरमधून पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे समजते. भाजपच्या पक्षांतर्गत पाहणीतही श्रृंगारे यांच्याविरोधात नाराजी असल्याचे समोर आल्याचे बोलले जाते. एकीकडे भाजपसमोर महाराष्ट्रात मिशन 45 गाठण्याचे उदिष्ट, तर दुसरीकडे मजबूत असलेल्या लातुरमध्ये विद्यमान खासदाराविरोधात नाराजी, अशावेळी भाजप जोखीम पत्करणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे 2024 ची उमेदवारी देतांना भाजपचे पक्षश्रेष्ठी भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारीच्या शर्यतीत माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री संजय बनसोडे यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु ही जागा भाजपची असल्यामुळे बनसोडे यांना कमळ चिन्हावर लढण्याची गळ घातली जाऊ शकते. महायुती म्हणून लोकसभेची निवडणूक तीनही पक्ष एकत्रित लढणार असल्यामुळे राज्यातील व मराठवाड्यातील काही मतदारसंघात अशा तडजोडी केल्या जाऊ शकतात, असाही अंदाज आहे.

पुण्यात बैठक

दरम्यान, आजच (रविवारी) लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात भाजपची पुण्यात बैठक झाली. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर हेही या बैठकीला हजर होते. परंतु या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही असे समजते. ही पहिलीच बैठक होती, या संदर्भात आणखी काही बैठका होणार असून त्यानंतरच लातूरमध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल? हे स्पष्ट होईल.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT