Latur News : काँग्रेसने लातूर लोकसभा मतदारसंघातून डाॅ. शिवाजी काळगे यांच्या नावाची घोषणा करून त्यांच्या प्रचाराचा धडकाही सुरू केला, तर दुसरीकडे काँग्रेसच्या आधी उमेदवारी जाहीर झालेले भाजपचे सुधाकर श्रृंगारे मात्र अजूनही सायलेंट मोडवरच आहेत. श्रृंगारे यांच्या उमेदवारीवरून जिल्ह्यात भाजपचे दोन गट पडल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला अजूनही पाहिजे तसा वेग आलेला नाही. (Lok Sabha Election 2024)
जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधीमध्येही फारसा उत्साह दिसत नाही. श्रृंगारे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरणारे आमदार अभिमन्यू पवार, रमेश कराड एकीकडे तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रृंगारे यांच्या निवडीचे स्वागत आणि अभिनंदनाचा सोपस्कार पार पाडणारे आमदार संभाजी पाटील निलंगेकर दुसरीकडे असे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुधाकर श्रृंगारे यांच्या उमेदवारीबद्दल अनेक शंका आधीही उपस्थितीत केल्या जात होत्या आणि आता त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतरही उलटसुलट चर्चा सुरूच आहेत. त्यात लातूर बीजेपी लूजिंग हा ट्विटर ट्रेंड आणि श्रृंगारे यांची उमेदवारी बदलणार, याचीही भर पडली. काँग्रेस ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी स्वतः अशी चर्चा असल्याचे आपल्या एका भाषणात सांगितले होते.
सध्या राज्यातील राजकारणाची परिस्थिती आयपीएलसारखी झाली असून, कोणता खेळाडू कोणत्या संघातून खेळतोय हेच कळत नाही. पण काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे, जो टीम इंडियाप्रमाणे खेळतोय, असा टोलाही धीरज देशमुख यांनी लगावला. श्रृंगारे यांची उमेदवारी बदलण्याची चर्चा लातुरात असल्याचे सांगणाऱ्या धीरज देशमुख यांनी डाॅ. शिवाजी काळगे यांचे कौतुक करताना त्यांच्या विजयाची खात्री दिली.
काळगे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून देशमुख बंधू पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पालथा घालत आहेत. मेळावे, बैठका, बूथप्रमुखांशी चर्चा आणि भेटीगाठीचा धडाका अमित आणि धीरज देशमुख यांनी लावला आहे, तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे अजूनही लग्नकार्य व इतर कार्यक्रमाना हेजरी लावण्यातच रमले आहेत.
महायुती म्हणून शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षाने तर श्रृंगारे यांच्या उमेदवारीची अद्याप दखलच घेतल्याचे दिसत नाही. महायुतीच्या संयुक्त मेळाव्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकारी गायबच झाले आहेत. लातुरात हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला टाॅप गिअर टाकावा लागणार आहे.
त्याआधी पक्षांतर्गत गटबाजी, हेवेदावे बाजूला सारून कामाला लागावे लागणार आहे. निलंगेकर-पवार या जोडीलाही पूर्ण क्षमतेने कामाला लावण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांना लातुरात लक्ष घालण्याची गरज आहे. उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतलेली भारतीय जनता पार्टी (BJP) प्रचारात मात्र सध्या तरी पिछाडीवर असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.