Congress MLA Amit Deshmukh addresses a public meeting in Nilanga, launching a sharp attack on BJP leaders over alleged corruption and demanding a white paper on Ausa constituency development funds. Sarkarnama
मराठवाडा

Latur ZP Election Result: लातूर झेडपीत काँग्रेसच मोठा पक्ष, पण...; भाजप 'असा' फिरवणार राजकीय खेळ

Latur ZP Election Result: लातूर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात यशस्वी ठरलेल्या अमित देशमुख यांनी झेडपीमध्येही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे.

Jagdish Pansare

Latur ZP Election Result: लातूर महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात यशस्वी ठरलेल्या अमित देशमुख यांनी झेडपीमध्येही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. 23 जागा जिंकत काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला. पण 18 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप राज्याच्या सत्तेत युतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेत गणित जुळवण्याच्या तयारीत आहे.

लातूर महापालिकेच्या यशानंतर काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीतही मुसंडी मारली. भाजपकडून आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेशअप्पा कराड हे तिघे काँग्रेसवर तुटून पडले होते. विशेषतः अभिमन्यू पवार आणि अमित देशमुख यांच्यातील राजकीय कलगितुरा चांगलाच रंगला होता. जिल्हा परिषदेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे अमित देशमुख यांचे स्वप्न युतीमुळे भंगणार आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषदांपैकी सात ते आठ ठिकाणी भाजपाने बाजी मारली आहे. लातूरमध्ये भाजपने अमित देशमुख यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मांजरा साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांच्या ऊसाला काटा लावला जातो, असा गंभीर आरोप करण्यात आला. अमित देशमुख यांनी ठेकेदार, वाळू, टँकर माफियांना तिकीटे दिल्याचा हल्लाबोल आमदार अभिमन्यू पवार यांनी केला होता. या आरोपांवर अमित देशमुख यांनी भाजपाच्या भ्रष्ट कारभाराकडे बोट दाखवत लातूर महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेची सत्ता काँग्रेसच्या हाती सोपवण्याचे आवाहन मतदारांना केले होते. उमेदवार देण्यापासून त्यांच्या नियोजनबद्ध प्रचाराची सगळी सूत्रं अमित देशमुख यांनी आपल्या हाती ठेवली होती. एरवी अमित देशमुख यांना सहकार्य न करणारे अशोक पाटील निलंगेकर हे ही या निवडणुकीत सक्रीय झाले होते.

या सगळ्याचा परिणाम काँग्रेसचे सर्वाधिक 23 सदस्य निवडून येण्यात झाला. बहुमताचे मॅजिक फिगर गाठण्यासाठी या पक्षाला आणखी सातचे संख्याबळ हवे आहे. वंचित आघाडी पक्षाला खातेही उघडता आले नाही. तर आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येक एक जागा मिळाली आहे. दोन अपक्ष आणि एक मनसेच्या उमेदवाराला सोबत घेतले तरी काँग्रेसला बहुमत गाठणे कठीण जाणार आहे.

राष्ट्रवादी ठरणार किंगमेकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला आहे. हे तेरा आणि भाजपचे अठरा असे एकूण 31 म्हणजेच बहुमताचा आकडा पार होतो. राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे भाजपसोबतच जाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार एवढे मात्र निश्चित आहे. लातूर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेतही चांगले यश मिळवले आहे.

लातूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

भाजप- 18

काँग्रेस- 23

राष्ट्रवादी -12

शिवसेना - 01

शिवसेना (उबाठा) 01

राष्ट्रवादी काँग्रेस (शप)-01

वंचित-00

अपक्ष-2

मनसे 01

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT