chandrakant khaire udayanraje bhosale sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : खैरेंनी मारली उदयनराजेंची स्टाइल, केला विजयाचा दावा...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajianagar : शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांच्यात उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष मिटला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः मध्यस्थी करत या दोघांनाही शांत केले. छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी आपल्यालाच मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला आहे.

राजकारणात अनेक नेत्यांच्या स्टाइल प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक म्हणजे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले. त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलवर समर्थक अगदी जीव ओवाळून टाकतात. उदयनराजे भोसले यांच्या याच स्टाइलची भुरळ खैरे यांनाही पडली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विजय कोणाचा होणार? यावर उत्तर देताना खैरेंनी कॉलर उडवत आमचाच. इथे शिवसेनेचाच भगवा पुन्हा फडकणार, असा दावा केला. खैरेंच्या या कॉलर उडवून केलेल्या विजयाच्या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांच्या थोडक्यात पराभव झाला होता. हक्काच्या मतांचे विभाजन झाल्यामुळे 'एमआयएम'चे इम्तियाज जलील संभाजीनगरमधून विजयी झाले होते. खैरे यांचा पराभव ज्या परिस्थितीत झाला होता तो लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी 2024 साठी खैरेंच्या नावालाच पसंती दर्शवली. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी आता फक्त औपचारिकता उरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'एमआयएम'ने पुन्हा इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यामुळे संभाजीनगर मतदारसंघातील यावेळची लढतही रंगतदार होण्याची शक्यता आहे. "आपल्या पाच वर्षांतील तीन वर्षे कोरोना काळामुळे वाया गेली, ना निधी मिळाला ना, कोणती विकासकामे करता आली. पण, उर्वरित दोन वर्षांत मी शक्य तेवढी विकासकामे करत संसदेत सामन्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्या. या जोरावर मतदार मला पुन्हा संधी देतील," अशी अपेक्षा इम्तियाज यांनी व्यक्त केली आहे.

तर खैरे यांना मतदार गेल्यावेळी केलेली चूक पुन्हा करणार नाही, माझा विजय पक्का आहे, असे म्हणत पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेष म्हणजे हे सांगताना खैरेंनी उडवलेली कॉलर चर्चेचा विषय ठरत आहे. अर्थात खैरे-इम्तियाज यांनी कितीही दावे केले, तरी मतदारच पुन्हा दिल्लीला कोणाला पाठवायचे हे ठरवणार आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT