Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel News : इम्तियाज जलील यांना हवाय शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद; 'मतांचा प्रसाद' मिळणार का?

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, महायुतीचे संदीपान भुमरे हे ही बाबाजींचे आशिर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagr News : एमआयएमचे उमेदवार विद्यमान खासदार इम्तियाज जलील सध्या मंदिर, मशिद, गुरुद्वारा, बौध्द विहार अशा सर्वच धार्मिक आणि प्रार्थनास्थळांना भेटी देताना दिसत आहेत. दुसऱ्यांदा खासदार व्हायचे असेल तर सर्वधर्मीयांची मतं मिळवावी लागतील, हे पक्के ध्यानात आल्यामुळे इम्तियाज जलील साधु-संताचे आशिर्वादही घेत आहेत.

वेरुळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांचे नुकतेच इम्तियाज यांनी त्यांच्या वेरुळच्या मठात जाऊन दर्शन घेतले. शांतीगिरी महाराज स्वतः नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत. यापूर्वी 2009 मध्ये त्यांनी संभाजीनगर मधूनही नशीब आजमावले होते, पण त्यांचा पराभव झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सव्वा लाखांहून अधिक मतं त्यांनी तेव्हा घेतली होती. महाराजांचा भक्त परिवार मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र अशा भागात मोठ्या प्रमाणात आहेत. राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी म्हणत बाबाजींनी नाशिक लोकसभा मतदारसंघात उडी घेतली. त्यामुळे संभाजीनगर मतदारसंघात असलेल्या त्यांच्या भक्तांचा मतरुपी आशीर्वाद आपल्याला मिळावा, यासाठी इम्तियाज जलील यांनी बाबाजींची भेट घेतल्याचे बोलले जाते.

तसे पाहिले तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, महायुतीचे संदीपान भुमरे हे ही बाबाजींचे आशिर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दोघांचा त्यांच्याशी संपर्क झाला की नाही? हे अद्याप समोर आलेले नाही, पण त्याआधीच इम्तियाज जलील यांनी बाबाजींची भेट घेत त्यांना राजकीय मदतीसाठी साकडे घातले.

एमआयएम-वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) गेल्या निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून इम्तियाज यांनी बाजी मारली होती. या ऐतिहासिक विजयचा डंका एमआयएमने देशभरात वाजवला होता. पण ज्या वंचित बहुजन आघाडीच्या भक्कम पाठिंब्यावर इम्तियाज जलील हे महाराष्ट्रातील एमआयएमचे एकमेव खासदार म्हणून निवडून गेले होते, ते सध्या एकाकी असल्याचे चित्र आहे.

वंचित आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिल्याने दलितांची मते तर दुरावली, पण मुस्लिम मतांमध्येही अफसर खान यांच्या रुपाने वाटेकरी निर्माण झाला. पण 'हिम्मत ए मर्दा तो मदद ए खुदा' या प्रमाणे इम्तियाज जलील लढा देताना दिसत आहेत. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी स्वतः दोन दिवस संभाजीनगरात ठाण मांडून होते. उन्हातान्हात, गल्लीबोळात जाऊन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्यासाठी पदयात्रा काढली, मेळावे, कार्नर बैठका, सभा घेतल्या.

एवढेच नाही तर मुस्लिम मतांची टक्केवारी वाढावी ते शतप्रतिशत व्हावे, यासाठी धर्मगुरुंच्या माध्यमातून आवाहन केले. मुस्लिम मतांचा टक्का वाढला तर विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांची जमवाजमव होऊ शकते, असा विश्वास ओवेसी यांना आहे. एकीकडे मुस्लिम मतांचा टक्का वाढवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत इतर धर्मीयांची काही प्रमाणात मतं वळविण्यासाठी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचे प्रयत्न सुरू आहेत. शांतिगीरी महाराजांची त्यांनी आश्रमात जाऊन घेतलेली भेट हा त्याचा भाग समजला जातो.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT