Tanaji Sawant Omraje Nimbalkar sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar News : "पद्मसिंह पाटील अन् राणा यांना गार करून आलो, तू किस झाड की पत्ती है," ओमराजेंचा सावंतांना इशारा

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant : धाराशिव लोकसभा मतदारसंघात तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात वाद रंगला आहे.

Akshay Sabale

धाराशिव लोकसभा मतदारसंघ ( Dharashiv Lok Sabha Election 2024 ) हा शिवसेनेचा ( Shivsena ) बालेकिल्ला. पण, पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना, असा सामना मतदारसंघात रंगण्याची शक्यता होती. पण, हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेल्यानं तिथे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील ( ranajagjitsinha patil ) यांच्या पत्नी अर्चना पाटील ( Archana Patil ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच मंत्री तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या टीकेचा ओमराजे निंबाळकर यांनी समाचार घेतला आहे.

तानाजी सावंत काय म्हणाले?

"सगळ्या सहकारी संस्थांची याने आणि त्याच्या वडिलांनी वाट लावली. तेरणा सहकारी कारखाना बंद पाडला आणि भंगार विकलं. खापर पद्मसिंह पाटील यांच्यावर फोडलं. तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं. तुझ्यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टाची 60 लाख क्विंटल साखर विकली," असा एकेरी उल्लेख करत सावंत ( Tanaji Sawant ) यांनी ओमराजे निंबाळकर ( Omraje Nimbalkar ) यांच्यावर टीका केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावरून ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी यांना इशारा दिला आहे. "मी 40 वर्षे मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांना गार करून आलो. तू किस झाड की पत्ती है," अशा शब्दांत ओमराजे निंबाळकरांनी तानाजी सावंत यांचा सुनावलं आहे.

दरम्यान, धाराशिव मतदारसंघातून तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे निवडणुकीची तयारी करत होते. पण, ऐनवेळी हा मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीला गेल्यानं धनंजय सावंत यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच, अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचार सभेत तानाजी सावंत यांनी अजितदादांसमोर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

तानाजी सावंत यांनी म्हटलं, "महायुतीचा उमेदवार कोणीही असेना, पण धनंजय सावंत यांनी 26 जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात केली होती. धाराशिव हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीनं कडवट शिवसैनिकांचा आहे. तो कडवट बाणा शिवसैनिक कधीही सोडणार नाही. तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन नेत्यांनी हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला."

"अशाच पद्धतीनं शिवसैनिकांचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला, तर हा शिवसैनिक आणि मी स्वत: हा कधीही सहन करणार नाही. कारण, पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे. या ठिकाणाहून आठ वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेला आहे. हा तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे. पण, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपलं दु:ख विसरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या पुढं जात अर्चना पाटलांना लीड द्यायचं आहे," असं आवाहन तानाजी सावंतांनी केलं होतं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT