jyoti mete sharad pawar pankaja munde sarkarnama
मराठवाडा

Beed Lok Sabha Election 2024 : बीडमध्ये शरद पवारांची मोठी रणनीती, ज्योती मेटेंना पंकजा मुंडेंविरोधात उतरवणार?

Jyoti Mete Latest News : ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष जरी महायुतीत असला, तरी अलीकडे महायुतीत असलेल्या घटक पक्षांना दुय्यम वागणूक मिळाली आहे.

Akshay Sabale

बीड : 16 मार्च | लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha ELection 2024 ) घोषणा आज ( 16 मार्च ) केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. देशात सात, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर, 4 जूनला निकाल हाती येणार आहे. भाजपनं बीडमधून प्रीतम मुंडे ( Pritam Munde ) यांच्याऐवजी पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार पंकजा मुंडेंच्या विरोधात उतरणार, याची चर्चा रंगली आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नीचं नावंही आघाडीवर आहे.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येसुद्धा फूट पडली आहे. बीडमधील राष्ट्रवाचे मातब्बर नेते धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत सामील झाले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांची ताकद मिळणार आहे. "धनंजय मुंडे महायुतीत आल्यानं प्रीतम मुंडेंपेक्षा अधिकचे मताधिक्य मला मिळणार," असा विश्वास पंकजा मुंडेंनी ( Pankaja Munde ) व्यक्त केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातच विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ( Jyoti Mete ), राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, आरक्षण आंदोलन आणि सामाजिक चळवळीत काम करणारे बी. बी जाधव आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची नावं चर्चेत आहेत. पण, पक्षाऐवजी बाहेरचा चेहरा रिंगणात उतरवायचा आणि पक्षाची ताकद मागे उभी करायची, असं गणित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मांडलं जात आहे. ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष जरी महायुतीत असला, तरी अलीकडे महायुतीत असलेल्या घटक पक्षांना दुय्यम वागणूक मिळाली आहे.

त्यामुळे ज्योती मेटेंना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून विचारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्योती मेटे यांचे पती दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यात मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचे आरक्षण या मुद्द्यासह सामाजिक चळवळीत कायम सक्रिय सहभाग घेतला. त्यांचा मृत्यूदेखील मराठा समाजाच्या आरक्षण बैठकीला जाताना वाहन अपघातात झालेला आहे. अन्य सर्वच समाजात दिवंगत मेटेंबद्दल असलेला आदर आणि सहानुभूती याचा फायदा ज्योती मेटेंना होऊ शकतो.

'साम टीव्ही'शी संवाद साधताना ज्योती मेटे म्हणाल्या, "शरद पवारांशी अद्याप भेट झाली नाही. लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला, तर विजयापर्यंत जाण्यासाठी सगळ्या गोष्टी करणार. शिवसंग्राम नैसर्गिकरित्या महायुतीबरोबर आहे. आगामी काळात ही समीकरण बदलणार की नाही, हे ठामपणे सांगता येणार नाही. पण, पक्षातील वरिष्ठांमध्ये विश्लेषण सुरू आहे."

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT