Beed News: बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha 2024) भाजपने सलग दोनदा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)देखील बीडच्या जागेबाबत मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
दोनच महिन्यांपूर्वी परळीमध्ये पंकजा मुंडे यांनी आपण बहिणीच्या जागेवर लोकसभा लढविणार नाही, असे जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. तर, बीडला झालेल्या महायुतीच्या मित्रपक्ष संमेलनात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसंग्राम आशा सर्वच पक्षांतील नेत्यांनी प्रीतम मुंडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकून त्या खासदारकीची हॅट्ट्रिक करणार अशी घोषणा केली होती.
प्रीतम मुंडेंनीदेखील आपण सर्व नेत्यांच्या आग्रहाचा सन्मान करत असल्याचे सांगत त्या दृष्टीने परवापर्यंत आपली वाटचाल सुरू ठेवली. मात्र, बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंना रिंगणात उतरले आहे. आता त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनीदेखील व्यूव्हरचना आखली आहे. सत्ताधाऱ्यांबद्दलची नाराजी, आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजात असलेली धग आणि इतर मुद्द्यांचा लाभ उठू शकणारा व जिल्हाभरात स्वतंत्र ओळख आहे, असा चेहरा पवारांच्या राष्ट्रवादीकडून शोधला जात आहे.
या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी काही प्रमुख नेत्यांना संपर्कदेखील साधल्याचे सूत्रांची माहिती आहे. यात प्रामुख्याने शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती विनायक मेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, आरक्षण आंदोलन आणि सामाजिक चळवळीत काम करणारे बी. बी. जाधव आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची नावे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून माजी मंत्री जयसिंग गायकवाड, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. सुशीला मोराळे, ईश्वर मुंडे आदी नेते तयारी करत आहेत. त्यांचे भेटीगाठींचे सत्र सुरूच आहे. पक्षाऐवजी बाहेरचा चेहरा रिंगणात उतरवायचा व पक्षाची ताकद मागे उभी करायची असे गणित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मांडले जात आहे. डॉ. ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष जरी महायुतीत असला तरी अलीकडे महायुतीत छोट्या घटक पक्षांना दुय्यमच वागणूक आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. ज्योती मेटे यांना विचारणा करण्यात आली आहे. डॉ. मेटे यांचे पती दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यात मराठा समाजाचे आरक्षण, मुस्लिम समाजाचे आरक्षण, धनगर आरक्षण या मुद्द्यासह सामाजिक चळवळीत कायम सक्रिय सहभाग घेतला. त्यांचा मृत्यूदेखील मराठा समाजाच्या आरक्षण बैठकीला जाताना वाहन अपघातात झालेला आहे. इतर सर्वच समाजात दिवंगत मेटेबद्दल असलेला आदर व सहानुभूती याचा फायदा डॉ. ज्योती मेटे यांना होऊ शकतो.
दुसरे नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच बजरंग सोनवणे. दोन साखर कारखाने चालविणारे बजरंग सोनवणे यांनी मागच्या वेळेस भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचीही जिल्हाभर ओळख आहे. निवडणूक लढविण्याचे तंत्र, यंत्रणा वापरण्याची क्षमता या बाबीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांनादेखील विचारणा झाल्याची माहिती आहे.
तिसरे नाव म्हणजे आरक्षण आंदोलन आणि सामाजिक चळवळीत काम करणारे व जिल्ह्यातील सनदी लेखापाल बी. बी. जाधव यांचे नावदेखील चर्चेत आहे. राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व बी. बी. जाधव यांची भेट घालून दिल्याचीदेखील माहिती आहे. सामाजिक चळवळीत काम करण्यामुळे त्यांचीदेखील जिल्हाभरात ओळख आहे. तसेच यशस्वी उद्योजक असल्याने या घटकातदेखील त्यांचा चांगले वजन आहे. त्याचा पक्षाला फायदा होईल, अशी गणिते मांडली जात आहेत. त्यामुळे बी. बी. जाधव यांच्याबाबत दोन्ही गटांकडून समान बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.
चौथे नाव म्हणजे माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे आहे. आरोग्य खात्यात नोकरीला असले तरी डॉ. थोरात यांचा राजकीय वावर बऱ्यापैकी आहे. त्यांनी दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांचे खासगी सचिव म्हणून काम केले आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या भावजय जिल्हा परिषद सदस्या आहेत. आता या पक्षाबाहेरील चार नेत्यांपैकी कोणाला उमेदवारी मिळते का पक्षातून उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेल्या माजी मंत्री जयसिंग गायकवाड, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. सुशीला मोराळे, ईश्वर मुंडे, गंगाभीषण थावरे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.