Chhatrapati Sambhajinagar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकदा टीका केली होती. त्यांना उद्देशून अकेला देवेंद्र क्या करेगा, असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यानंतर राज्यात जे घडलं ते सगळ्या महाराष्ट्राने, देशाने पाहिले. भाजपने सुप्रिया सुळे यांना त्यावरून डिवचण्याची संधी सोडली नव्हती. आता पुन्हा एकदा याच विधानाची आठवण होण्याचे कारण म्हणजे राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरवत केलेलं धाडस हे आहे.
वंचित घटकांना सत्तेत बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगत प्रकाश आंबेडकर राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांशी दोन हात करत आहेत. अनेकदा त्यांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित झाल्या, त्यांच्यावर हेकेखोर स्वभावाचा आरोप विरोधकांनी केला. पण आंबेडकरांनी आपला बाणा काही सोडला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाशी युती करत राज्यात वेगळा पॅटर्न आणला. दलित-मुस्लिम आणि इतर वंचित घटकांना सोबत घेत जय भीमचा नारा देत एमआयएम-वंचित आघाडीने राज्यात धुमाकूळ घातला.
प्रस्थापित पक्ष या नव्या राजकीय समीकरणाने हादरले होते. वंचितच्या या डावाने लोकसभेच्या वीस मतदारसंघांतील चित्र बदलले. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात एक खासदार निवडून आला. पण ज्या प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम-वंचितच्या युतीचा योग जुळवून आणला होता ते अकोला, सोलापूर या दोन्ही मतदारसंघांतून पराभूत झाले. सोलापुरातील पराभवाचे खापर मुस्लिमांवर फोडले गेले. वंचितमुळे एमआयएमला एकगठ्ठा दलित समाजाची मते मिळाली, संभाजीनगरात इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले.
परंतु मुस्लिम मतदारांनी मात्र सोलापुरात प्रकाश आंबेडकरांना मदत केली नाही, असा आरोप झाला. याचे व्हायचे ते परिणाम झाले आणि सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमला बाजूला सारत स्वबळावर उमेदवार दिली. वंचितचा एकही उमेदवार राज्यात निवडून आला नाही, पण त्यांच्या उमेदवारांनी अनेकांच्या आमदारकीचे स्वप्नं धुळीस मिळवले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत अकेली वंचित आघाडी मैदानात उतरली आहे. गेल्या निवडणुकीत जुळून आलेले दलित-मुस्लिम मतांचे काॅंम्बिनेशन आता राहिलेले नाही. त्यामुळे वंचित आघाडी लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव टाकू शकते? याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यासह मराठवाड्यातील (Marathwada Politics) आठ लोकसभा मतदारसंघात वंचितने उमेदवार दिले आहेत. महायुती-महाविकास आघाडीच्या थेट लढाईत वंचितमुळे अनेक मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतु मताचे विभाजन होऊन त्याचा फायदा एखाद्या पक्षाला मिळवून देणे हा काही वंचितचा अजेंडा निश्चित नसणार आहे.
परंतु परिणाम मात्र तोच होणार आहे. अकेली वंचित (Vanchit Bahujan Aaghadi) लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आणि पूर्व इतिहासही आहे. मग महाविकास आघाडीसोबत तडजोड करून एकत्रित निवडणूक लढवली असती तर कदाचित वंचितचे महाराष्ट्रात खाते उघडू शकले असते.
पण प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) ती संधी दवडली का? तर याचे उत्तर हो आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचण्याची भाषा करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील महाविकास आघाडी आणि देश पातळीवरील इंडिया आघाडीचा भाग होताना टाकलेल्या अटी, केलेल्या मागण्या अवास्तव होत्या का? आंबेडकरांना आघाडी करायची होती की, मग महाविकास आघाडीत बिघाडी? अशा अनेक चर्चांना या निमित्ताने तोंड फुटले.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी वाट पाहीन, असं सांगणारे प्रकाश आंबेडकर प्रत्यक्षात मात्र राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करून मोकळे झाले. आता स्वबळावर म्हणजे अकेली वंचित आघाडी क्या करेंगी? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.