Mahadev Jankar Sarkarnama
मराठवाडा

Mahadev Jankar : महादेव जानकरांनी परभणीचा नाद सोडला? आता माढ्यासाठी जोर लावणार

Prasad Shivaji Joshi

Parbhani Political News : निवडणुकीचे वेध लागले की राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये सत्तेची महत्त्वाकांक्षा जागृत होते. त्यातून दावे-प्रतिदावे केले जातात. मात्र स्थानिक परिस्थिती, मतदारांचा कानोसा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वरिष्ठांचा आदेश आला की सर्व निर्णय बदलावे लागतात. बीड येथील ओबीसी मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. आता मात्र जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले होते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना ते बहीण मानतात. मात्र नंतरच्या काळात जानकरांचे भाजप नेतृत्वाशी खटके उडू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती आणि महाविकास आघाडीपासून लांब राहत स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले.

बीड येथील ओबीसी मेळाव्यात त्यांनी स्वत: परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. परभणीतही त्यांनी याचा पुनरुच्चार करत निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा आत्मविश्वासही व्यक्त केला. तसेच मतदारसंघातील बूथरचनेचे कार्यही जोमात सुरू असल्याचे सांगितले. मात्र जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. त्यांचा प्रचाराचा प्रारंभ 17 फेब्रुवारी रोजी फलटण येथे होणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या 10 फेब्रुवारी रोजी बारामती येथील बैठकीत फलटण येथे जाण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. महादेव जानकर यांना परभणी पेक्षा माढा लोकसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित ठरू शकतो. जानकर यांनी राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभीपासूनच माढा व बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2009 च्या लोकसभा निवडणुकीत जानकरांनी माढा (Mhada) लोकसभा मतदारसंघात 98 हजार 946 मते मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत तब्बल चार लाख 51 हजार मते घेऊन दुसरे स्थान मिळवले होते.

आता परभणीसारख्या अगदीच नवख्या ठिकाणी निवडणूक लढवण्यापेक्षा माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणे जानकर यांच्या सोयीचे आहे. जानकर यांच्या माढा येथील तयारीने परभणीतील महायुतीच्या नेत्यांनी तूर्त सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र माढा येथील विद्यमान खासदार भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांच्यासाठी तसेच महायुतीच्या राज्यपातळीवर नेतृत्वासाठी हे डोकेदुखी ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT