Mahadev Koli-Hyedrabad Gazette News Sarkarnama
मराठवाडा

Hyderabad Gazette News : 'हैदराबाद गॅझेट'साठी महादेव कोळी समाजही आक्रमक; मुक्तीसंग्राम दिनीच दाखवणार काळे झेंडे!

The Mahadev Koli community has taken an aggressive stand : 1950 पूर्वीचा 'कोळी' नोंदीचा पुरावा ग्राह्य धरून आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी समाजाला एसटी प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र द्यावे.

Jagdish Pansare

राम काळगे

Marathwada News : मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा, अशी मागणी मान्य झाल्यानंतर आता बंजारा, महादेव कोळी व इतर समाजही आक्रमक झाले आहेत. हैदराबाद गॅझेटचा जीआर बंजारा आणि महादेव कोळी समाजालाही लागू करा, त्यानूसार आरक्षण द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बंजारा समाजाने आपल्या मागणीसाठी मोठे आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे. तर त्यापाठोपाठ महादेव कोळी समाजानेही दंड थोपटत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी आंदोलन पुकारत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे.

आदिवासी क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी एकच कायदा असताना मराठवाड्यातील (Marathwada) महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी समाजावर अन्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मराठा समाजा प्रमाणे आम्हालाही हैद्राबाद गॅझेट लागू करून जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ करा, अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी काळे झेंडे दाखवून निषेध करू, असा इशारा मराठवाडा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांनी दिला आहे.

दादगी ता. निलंगा येथे झालेल्या एल्गार मेळावा नुकताच पार पडला. 'कोळी' ही मुख्य जमात असून तिच्या उपजमातींना महाराष्ट्राच्या विविध भागांत अनुसूचित जमातीचा लाभ मिळतो. तत्कालीन आदिवासी मंत्री दिवंगत मधुकर पिचड, संशोधन आयुक्त दिवंद गोविंद गारे, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार किरण लहामटे यांच्यासह अनेक आदिवासी आमदारांनी 'कोळी' नोंदीवरूनच जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळवले आहेत. (Latur) मात्र मराठवाड्यातील व उर्वरित जमातीला या निकषा प्रमाणे न्याय मिळत नाही, ही समाजाची खंत आहे.

आदिवासी विकास विभाग क्षेत्रात 25 आदिवासी आमदार व 4 खासदार कार्यरत आहेत. मात्र आदिवासी क्षेत्राबाहेरील जमातींचे अस्तित्व या विभागाकडून मान्य केले जात नाही. त्यामुळे मराठवाड्यातील जमातीला सुलभतेने प्रमाणपत्र व वैधता मिळत नाही, असा आरोप केला जात असून 'कोळी' नोंदीवरून एसटीचे प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी मागील 40 वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आहे. 1950 पूर्वीचा 'कोळी' नोंदीचा पुरावा ग्राह्य धरून आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी समाजाला एसटी प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटियर लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोळी समाज बांधवांच्या नोंदी या गॅझेटियरमध्ये आढळून आल्या आहेत. 1950 साली निवृत्त न्यायाधीश सय्यद सिराज उल-हसन यांनी त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. या नोंदीमध्ये कोळी ही मुख्य जात आहे तर महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर तत्सम जमाती आहेत अशी नोंद आहे. त्यामुळे सरसकट हैदराबाद गॅझेटिअर लागू करून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावेत, या मागणीसाठी समाज रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रक्ताच्या नात्यातील दाखले अवैध कसे?

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासाठी दोन जात पडताळणी समित्या आहेत. कुटुंबात म्हणजेच रक्त नात्यात वडीलांची, काकांची, आत्याची, भावाची, चुलत भाऊ यापैकी वैधता झाली असेल तर अशा प्रकरणात पुन्हा गृह चौकशीची गरज नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तरीही सर्रासपणे या दोन्ही जात पडताळणी समितीकडून महादेव कोळी, मल्हार कोळी यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव रक्त नात्यात वैधता झाली असतानाही प्रत्येक प्रकरणात गृह चौकशी केली जाते व प्रत्येक प्रकरण अवैध ठरवले जातात, असा आरोपही मेळाव्यात करण्यात आला.

एकीकडे मराठा समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे रक्त नात्यातील वंशावळीचा व हैदराबाद गॅझेट हा सक्षम पुरावा असल्याचा संदर्भ देतात तर दुसरीकडे आदिवासी जमात असलेल्या कोळी महादेव समाजाचे रक्त नात्यातील पडताळणीचे दाखले सर्रासपणे अवैध ठरवले जातात. त्यामुळे स्थापन केलेली जातपडताळणी समित्या दाखले 'वैध' करण्यासाठी आहेत की 'अवैध' असा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाला असल्याचा आरोप मराठवाडा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांनी केला आहे. 17 सप्टेंबर पर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्याचा इशाराही मेळाव्यात देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT