Pritam Munde, MLA Prakash Solunke Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics: पंकजाताईंच्या जीवावर निवडून आले, आमदारकी पचवून ढेकर दिला; प्रकाश सोळंकेंवर प्रीतम मुंडेंचा पलटवार

Pritam Munde, Prakash Solanke, Beed Politics: प्रकाश सोळंके यांच्या आरोपांना प्रीतम मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यामुळे बीडमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

Jagdish Pansare

Beed Politics News: विधानसभा निवडणुकीत मराठा, ओबीसी उमेदवार दिला, त्यांना कोट्यावधी रुपये दिले आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजलगांवचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनगर समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना केला. त्यांचा रोख धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याकडे होता. काल माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजपाच्या एसआयआर शिबिरात बोलताना प्रकाश सोळंके यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

''पंकजाताईच्या जीवावर जे निवडून आले, ज्यांनी तीन वर्ष आमदारकी भोगली, पचवली आणि ढेकर दिले, तेच आता गरळ ओकतायेत. अशा लोकांना दूर ठेवयाचे असेल तर इथे शत प्रतिशत भाजपा आली पाहिजे'' असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी उपस्थितांना केले. शेतात पीक घ्यायचं असेल तर आधी मशागत करावी लागते, तशी माजलगाव मतदारसंघाची मशागत आपल्याला करावी लागेल, चांगले बियाणे पेरावे लागेल. मग त्याला भरपूर पाऊस मिळाला की आपल्या अपेक्षित पीक, उत्पन्न आणि त्याला चांगला भाव मिळेल.

माजलगांव मतदारसंघात आपल्या विचारांचा आमदार निवडून आणायचा असेल, शत प्रतिशत भाजपा धोरण राबवायचे असेल तर हे करावेच लागेल, असे सांगत प्रीतम मुंडे यांनी आक्रमक भाषण केले. आमदार प्रकाश सोळुंके यांनी काही दिवसापूर्वी मतदारसंघातील धनगर समाजाच्या एका कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी कोट्यावधी रुपये देऊन माणसं उभी करण्यात आली होती. पण जनतेने त्यांचा डाव हाणून पाडला, असे विधान करत अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याकडे बोट दाखवले होते.

या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांनी केलेल्या भाषणाने बीड जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. माजलगाव येथे भाजपाच्या 'एसआयआर' म्हणजे 'संघटन पर्व, सदस्यता अभियान, सक्रिय सदस्य' या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. काही लोकांना गरज असताना मुंडे साहेब आठवतात. गरज सरली की मुंडे कुटुंबाला विसरतात. अशी 'गरज सरो वैद्य मरो' ही कार्य पद्धती मतदारसंघाने ओळखली आहे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता आमदार प्रकाश सोळंके यांना टोला लगावला.

माजलगाव मतदारसंघात मुंडे व सोळंके कुटुंबाचा संघर्ष जुना आहे. 2024 च्या विधानसभा निवडणूकीत प्रकाश सोळुंके यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी भाजपचे नेते माधव निर्मळ यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. निर्मळ यांनी तेव्हाही सोळंकेंवर 'गरज सरो वैद्य मरो' अशीच टीका केली होती. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या सभांमुळेच सोळंकेंना विजयाचा मार्ग सुकर झाला होता. आज त्याच नेत्यांवर टीका करणे म्हणजे राजकीय कृतघ्नता आहे, असा आरोप निर्मळ यांनी केला होता.

पाच वेळा आमदार राहिल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी किती उद्योग, रोजगार आणि गुंतवणूक मतदारसंघात आणली याचा खुलासा जनतेसमोर करावा, असा सवाल तेव्हा निर्मळ यांनी केला होता. माजलगावच्या विकासात दिवंगत सुंदरराव सोळंके आणि गोपीनाथ मुंडे यांचेच योगदान मोठे असल्याचे भाजप नेते सांगतात. निवडणुकीत बाबरी मुंडे यांना उभे करण्यामागेही प्रकाश सोळंके यांचीच अप्रत्यक्ष भूमिका होती, असा आरोपही निर्मळ यांनी केला होता. तर रमेश आडसकर, माधव निर्मळ यांच्या उमेदवारीनंतरही सोळंके यांनी ५ हजार ८९९ मतांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, प्रकाश सोळंके यांनी अनेकदा धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावर कधी अप्रत्यक्ष तर कधी थेट टीका केली. याचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहे. प्रीतम मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांच्यावर नाव न घेता केलेला हल्लाबोल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रीतम मुंडे यांची बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कापून पंकजा मुंडे यांना देण्यात आली होती. त्यानंतर प्रीतम मुंडे सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्या होत्या. मात्र आता भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले असून त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा पश्चिम विभाग प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी आधीच प्रीतम मुंडे या बीड जिल्ह्यामधील गेवराई आणि माजलगाव मतदारसंघाचे काम पाहतील, असे जाहीर केले होते. त्यानुसार प्रीतम मुंडे माजलगावात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी सोळंकेंना लक्ष्य करत २०२९ ची तयारी सुरू केली आहे. मी कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करते. स्वतःच्या ताकदीच्या बढाया मारणाऱ्यांनी वास्तव विसरू नये, असा टोलाही प्रीतम मुंडे यांनी सोळंकेंना लगावला. प्रीतम मुंडेंच्या सोळंके यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेमुळे महायुतीतील अंतर्गत वादही या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT