Beed News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीने जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यभरात रविवारी महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात देखील महायुतीचा मेळावा पार पडला. मात्र, या मेळाव्याला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीच दांडी मारली. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
महायुतीत मित्रपक्ष वाढत आहेत. यातच निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. त्या दृष्टीने येत्या काळात सर्व नेते आणि पदाधिकारी यांच्यात सुसंवाद असावा, यादृष्टीने महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षासह महायुतीमधील मित्रपक्षांचे जिल्हानिहाय संमेलने आयोजित करण्यात आली आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बीड जिल्ह्यात या संमेलनाच्या समन्वयाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या संमेलनाची मागील आठ दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाचे मुख्य बॅनर राज्यपातळीवरून निश्चित झाले आहे. केंद्र, राज्य पातळीवरील नेत्यांसह महायुतीमधील घटक पक्षाच्या नेत्यांचे फोटो छापलेले आहेत.
या बॅनरवर जिल्ह्यातील पालकमंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तसेच शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे यांची छायाचित्रे आहेत. आगामी लोकसभा निवडणूक हा या संमेलनाचा अजेंडा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) या मेळाव्याला उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, त्या या मेळाव्याला अनुपस्थित राहिल्या.
पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आदी नेत्यांची उपस्थिती होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा जिल्ह्याशी संपर्क मोठ्या प्रमाणावर कमी आहे. राज्य पातळीवर देखील त्या फारशा सक्रिय दिसत नाहीत.
अनेकदा पक्षाकडूनच आपल्यावर कुठली जबाबदारी नसल्याने आपल्याला विनाकारण फिरू वाटत नाही, असे त्या म्हणतात. मात्र, दसरा मेळाव्यात आपण राज्यभर फिरणार असून आपल्याला कोण अडवते हे बघू, असे आव्हानही त्यांनी दिले होते. मात्र, राज्यभर नाही पण जिल्ह्यातही त्या का सक्रिय नाहीत? असा प्रश्न आता त्यांच्याच समर्थकांना पडत आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.