Government delegation to meet Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation: सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबवण्याचा आणखी एक प्रयत्न; लाड, विखे-पाटील पुन्हा अंतरवालीत जाणार!

Government attempts to stop Manoj Jarange Patil protest: सहा दिवसात प्रसाद लाड, सरकारकडून कोणते सकारात्मक उत्तर न आल्याने अखेर गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली.

Jagdish Pansare

Maratha Reservation Row: मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून 22 मे रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांचे प्रयत्न अपयशी ठरले. सहा दिवसात प्रसाद लाड, सरकारकडून कोणते सकारात्मक उत्तर न आल्याने अखेर गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली.

ही घोषणा करतानाच प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मराठा समाजासाठी आमदारकीचा राजीनामा देईल, या विधानाची आठवण करून दिली. आमदारकीचा राजीनामा नको, उपोषणाला सोबत येऊन बसा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी अंतरवालीतून केले. या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटील यांचे आंदोलन पुन्हा होऊ नये यासाठी आणखी एक प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे.

प्रसाद लाड यांची या संदर्भात सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करत ते स्वतः आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष 29 मे रोजी अंतरवालीत जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी जाणार असल्याचे सांगितले. 22 मे रोजी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर तुमच्या मागण्यावर उपसमिती सदस्यांशी चर्चा करून तुम्हाल पुन्हा भेटायला येतो, असे आपण त्यांना सांगितले होते.

त्यानूसार उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आपण जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात बोललो. यातून अनेक सकारात्मक बाबी घडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी समाजासोबतच राहणार आहे. इतर कोणाच्याही हक्कावर गदा येणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

यासाठी मी स्वतः आणि राधाकृष्ण विखे पाटील 29 मे रोजी अंतरवाली सराटीत जाणार आहोत. समाजाच्या हितासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. इतर समाजाचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी आम्ही घेणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण शंकांचे निरासन करण्याचा आम्ही या भेटीत प्रयत्न करणार आहोत. त्यांनी 30 मे रोजीचे आंदोलन करू नये, याची विनंती देखील त्यांना करणार असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT