

Manoj Jarange: राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, विद्यार्थी, मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी एकजुटीने पुन्हा मोठे आंदोलन उभारण्याची गरज आहे. आता एक घाव दोन तुकडे, अशा पद्धतीने लढा द्यावा लागेल. त्यासाठी 16 मे रोजी अंतरवाली सराटीतून राज्यातील मोठ्या आंदोलनाची घोषणा आणि तारीख जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
कांदा उत्पादक शेतकरी दर पडल्यामुळे हवालदिल झाला आहे, त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला ताकदीने एकत्रितपणे लढा द्यावा लागेल. हे सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सारथी असो की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा विषय असो, कुठल्याच विषयाला सरकार गांभिर्याने घेत नाहीये. यातून मराठा समाजाच्या पोरांचे मोठे नुकसान होत आहे.
सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला, पण कुणबी नोंदी शोधण्याचे काम बंद आहे, ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडीटी मिळत नाही. जूनमध्ये शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना त्यामुळे अचडणींना तोंड द्यावे लागत आहे. सातारा गॅझेट अजून का स्वीकारले जात नाही? मराठा आरक्षणाच्या लढ्यात ज्या तरुणांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी, आर्थिक मदत देण्याचे आश्वासनही पूर्ण केले जात नाही.
आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात शेकडो मराठा तरुणांवर गुन्हे दाखल आहेत. ते मागे घेणार असा शब्द सरकारकडून दिला गेला होता, मात्र तेही अजून मागे का घेतले जात नाही? असे असंख्य प्रश्न आहेत. सरकारला पुरेसा वेळ देऊनही हे प्रश्न सोडवले जात नाही. यातून सरकारला फक्त आम्हाला झुंजवत ठेवायचे असे दिसते. त्यामुळे या विरोधात पुन्हा एकत्रितपणे, एकजूट दाखवून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
येत्या 16 मे रोजी अंतरवाली सराटीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत एक घाव दोन तुकडे, पाडणारं आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन उभारण्याची घोषणा त्यादिवशी केली जाणार आहे. आंदोलनाची तारीखही त्याच दिवशी जाहीर करू आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.