Manoj Jarange : मनोज जरांगेंसोबतच्या चर्चेतून शिवसेनेला लांब ठेवलं? उदय सामंत, शिरसाट मराठवाड्यातच असतानाही प्रसाद लाड यांना पाठवलं!

Manoj Jarange : जरांगे पाटील यांच्या 30 मेच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणवीसांनी उदय सामंत किंवा शिरसाट यांना न पाठवल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
BJP MLA Prasad Lad meets Maratha reservation activist Manoj Jarange Patil ahead of the proposed hunger strike at Antarwali Sarati.
BJP MLA Prasad Lad meets Maratha reservation activist Manoj Jarange Patil ahead of the proposed hunger strike at Antarwali Sarati.Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Politics News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून जरांगे पाटील यांच्यासोबत आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. लाड यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या ऐकल्या अन् मुंबईत जाऊन चर्चा करून कळवतो असं सांगून निघून गेले.

आता लाड यांच्या याच भेटीवर राजकीयदृष्ट्या भाजपची चाल म्हणून बघितले जात आहे. लाड ना मंत्री आहेत, ना यापूर्वी कधी ते चर्चेच्या पिक्चरमध्ये होते. ना कोणत्या उपसमितीवर आहेत. अशावेळी निर्णयाचा किंवा शब्द देण्याचा कोणताही अधिकार नसलेल्या लाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का पाठवले असा सवाल विचारला जात आहे.

विशेष म्हणजे सरकारमधील मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय शिरसाट हे आज दिवसभर मराठवाड्यातच होते. सामंत यांनी यापूर्वीही जरांगे पाटील यांची अनेकदा भेट घेऊन चर्चा केली आहे. शिरसाट यांचेही जरांगे पाटील यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. तरीही त्या दोघांपैकी कोणालाही न पाठवता मुंबईवरून लाड यांना पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या चर्चेपासून लांब ठेवायचे आहे का? असाही सवाल उपस्थित होतो.

शिवसेनेचे मंत्री तथा एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे उदय सामंत यांनी दोन आठवड्यापूर्वी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. सामंत-जरांगे पाटील या भेटीनंतर लगेचच 15 दिवसांत जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केली. त्यामुळे याकडे संशयाने पाहिले गेले. जरांगे पाटील यांच्या उपोषणामागे शिंदेंच्या शिवसेनाचा हात आहे? अशा चर्चांना उधाण आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर सातत्याने टीका आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. आजही अंतरवाली सराटीत भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्याशी झालेल्या दोन तासांच्या प्रदीर्घ चर्चेतही जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांची नावे घेत ते कसे मराठा समाजाच्या कामाला येत आहेत, हे उदाहरणासह दाखवून दिले.

या उलट भाजपाच्या मंत्री, आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांनी फुगीर म्हणत सुनावले. प्रसाद लाड यांच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कौतुक झाले याचा निश्चितच त्यांना त्रास झाला असावा. मुळात भाजपाकडे मंत्र्यांची एवढी मोठी फौज असताना साधे आमदार असलेले प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील यांच्याशी एकटेच चर्चा करायला कसे गेले? याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असे लाड यांच्याबद्दल बोलले जाते. फडणवीस यांच्या सांगण्यावरून, त्यांचाच महत्वाचा निरोप घेऊन ते जरांगे पाटील यांना भेटायला आले, हा तर्क तितकासा पटत नाही.

BJP MLA Prasad Lad meets Maratha reservation activist Manoj Jarange Patil ahead of the proposed hunger strike at Antarwali Sarati.
Prasad Lad Meet Manoj Jarange: प्रसाद लाड यांच्या तोंडावरच मनोज जरांगेंकडून शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कौतुक!

शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी..

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपलाच टारगेट करतात असे बोलले जाते. राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटचा निर्णय हा या तीन पक्षांनी मिळून एकत्रित घेतला. त्यामुळे याचे श्रेय देखील तीनही पक्षांनी दिले गेले पाहिजे. परंतु मनोज जरांगे पाटील हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या काळात मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी सापडल्या. ते प्रोटोकाॅल बाजूला ठेवून मराठा समाजाचे, पोरांचे काम तातडीने करतात. त्यांचे मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई यांनीही आम्ही सांगीतलेली कामे तातडीने केली, याचा आवर्जून उल्लेख केला.

मनोज जरांगे पाटील यांचे हे वाढते शिवसेना प्रेम कुठेतरी भाजपाला खटकू लागले आहे. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांकडून पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळापासून शिवसेनेला व त्यांच्या मंत्र्‍यांना दूर ठेवण्यात आल्याचे बोलले जाते. उद्योग मंत्री उदय सामंत हे दोन दिवसांपासून संभाजीनगरमध्येच आहेत. सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे ही शहरातच होते. मनोज जरांगे पाटील ज्यांचा लाडाने मामा म्हणून उल्लेख करतात ते खासदार संदीपान भुमरे हे ही जिल्ह्यात आहेत. मात्र या पैकी कोणालाही प्रसाद लाड यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी जा, असा निरोप नव्हता.

भाजपाचे बदनापूरचे आमदार नारायण कूचे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड असे मोजकेच पक्षाचे नेते प्रसाद लाड यांच्यासोबत होते. त्यामुळे भाजपाने मनोज जरांगे पाटील यांचे 30 मे रोजी पासून सुरू होणारे उपोषण किती गांभीर्याने घेतले? हा प्रश्नच आहे. यापुर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल सरकारने गांभीर्याने घेत अख्ख मंत्रीमंडळ अंतरवालीत पाठवलं होतं. यावेळी मात्र मित्र पक्षाला दूर ठेवत मुंबईतून फक्त एक आमदार अंतरवालीत चर्चेसाठी पाठवण्यात आला.

जरांगेंचा संघटनांवर आरोप अन् लाड यांना धमकी..

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून 30 मे पासून पुन्हा उपोषणाची घोषणा जाहीर पत्रकार परिषद घेऊन केली. यावेळी त्यांनी सरकारकडून आपले आंदोलन चिरडण्याचे कसे प्रयत्न सुरू आहेत, हे सांगताना गंभीर आरोप केले होते. यात मराठा संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माझ्याविरोधात बोलण्यासाठी दोन दोन कोटी रुपये दिले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर आज जरांगे पाटील यांच्या चर्चेसाठी जात असताना प्रसाद लाड यांना मराठा संघटनांच्या दोन पदाधिकाऱ्यांनी धमकीचे फोन केल्याचा प्रकार समोर आला.

BJP MLA Prasad Lad meets Maratha reservation activist Manoj Jarange Patil ahead of the proposed hunger strike at Antarwali Sarati.
Manoj Jarange Patil : प्रसाद लाडांनी समजूत घातली पण जरांगे पाटील ठाम! नेमक्या त्यांच्या मागण्या काय?

लाड ज्या हाॅटलमध्ये थांबले होते, तिथे घुसून त्यांच्यावर शाई फेकण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे स्वतः लाड यांनीच जरांगे पाटील यांच्या भेटी दरम्यान सांगितले. या घटनेमुळे जरांगे यांच्या भेटीआधीच लाड यांची राज्यभरात चर्चा झाली. पोलीसांनी धमकी प्रकरणात दोन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ते कोणत्या संघटनेचे किंवा कोणाचे नेतृत्व मानतात हे पोलीस तपासात पुढे येईल. परंतु प्रसाद लाड साधे आमदार असताना मनोज जरांगे पाटील त्यांचीशी का चर्चा करतायेत? अशी टीकाही त्यांच्या विरोधकांकडून केली जात आहे.

जरांगे पाटील यांनी मात्र तुम्हीच मुख्यमंत्री समजून आम्ही तुमच्यासमोर समाजाच्या मागण्या मांडत आहोत, असे सांगत आपल्यासाठी समाजासाठी काम करणाला साधा आमदार देखील तितका महत्त्वाचा असल्याचे म्हटले. एकूणच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या आठ दिवस आधी मुख्यमंत्र्‍यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या प्रसाद लाड यांच्याशी चर्चा करून आपला निरोप देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवला आहे. मागण्या मान्य झाल्या नाही, तर उपोषण करणारच असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आता आमदार प्रसाद लाड यांची शिष्टाई यशस्वी होते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मागण्यावर ठोस निर्णय घेऊन त्यांचे संपू्र्ण श्रेय आपल्याकडे घेतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com