Beed News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेले मनोज जरांगे-पाटील यांची आज मराठवाड्यातील बीड शहरात इशारा सभा होणार आहे. या सभेसाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहे. दरम्यान, जरांगे यांनी या सभेपूर्वी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)
पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी केलेल्या टीकेवर विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, 'तुझी एवढी चांगली नियत असती आमच्याविषयी बोलायची हे जर मराठा समाजाला आधीच कळलं असतं तर बरं झालं असतं. तू किती खालच्या दर्जाच्या विचारांचा आहेस हे आधी कळलं असतं तर, तुला मराठ्यांनी इतकं मोठं केलंच नसतं'
जरांगे पुढे म्हणाले, 'मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचारांचा आहे. पण तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत. हे मराठ्यांना आधी माहितीच नव्हतं. मराठा समाजाने तुला चांगलं समजलं. तुला इतकं मोठं केलं. पण आता तू ओकायला लागला. आता मराठा समाजला कळलं, किता गटारगंगा होती, तुझ्या मनात,' अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांचा समाचार घेतला.
जरांगेचं म्हणणं सरकारनं ऐकलं पाहिजे. जे सोयरे आहेत, पत्नीचे आईवडील, त्यांची मुलं, व्याह्यांचे व्याही...त्या व्याह्यांचे व्याही... अशी जी सर्व साखळी आहे त्या सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे. आपण जरांगेचं ऐकलं पाहिजे, नाही तर ते मोर्चा घेऊन येतील, असा खोचक टोला भुजबळांनी लगावला होता.
सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटण्यासाठी जाते, यावरून भुजबळांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. 'मंत्री सारखे सारखे तिकडे जातात, त्यापेक्षा दोन-चार बंगले, चीफ सेक्रेटरीचं कार्यालय, अंतरवाली सराटीत उभारा, म्हणजे त्यांनी सांगितलं की लगेच जीआर काढता येईल. जाण्या-येण्याचा त्रास वाचेल. जरांगेंच्या मनात अभिनव कल्पना येत असतात. मग मंत्री त्यांच्याकडे जातात, त्यापेक्षा आपलेच मंत्री तिथे राहिले तर बरं होईल', असा टोला भुजबळांनी लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.