Manoj Jarange Patil Hunger Strike Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : महिलांचा हंबरडा, महाराजांची विनंती अन् हात-पाय घट्ट पकडून लावले सलाईन

Datta Deshmukh

Beed News: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांबाबत 'सगेसोयरे' या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना दोन दिवसांपासून घोटभर पाणी तरी प्या, अशा विनवण्या समाज बांधव व विशेषत:महिलांकडून केल्या जात होत्या. (Manoj Jarange Patil Hunger Strike)

बुधवारी त्यांच्या नाकातून रक्त आल्यानंतर अंतरवाली सराटीतले वातावरण अधिकच भावूक झाले. उपस्थित महिलांनी हंबरडा फोडला. तर, श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी सलाईन घेण्याची विनंती मनोज जरांगे पाटील यांना केली. यानंतर उपस्थित काही समाज बांधवांनी तुम्ही तुमचे नाहीत समाजाचे आहात असे म्हणत त्यांचे हात-पाय घट्ट पकडले आणि मग डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी विविध आंदोलने, दोन वेळा उपोषणे, विविध ठिकाणी सभा, मुंबईकडे समाज बांधवांसह प्रयाण केल्यानंतर सरकारने केलेल्या चर्चेनंतर मुंबईच्या वेशीवरुन जरांगे पाटील समाजासह परतले. समाजाच्या कुणबी-मराठा या सापडलेल्या नोंदींबाबत 'सगेसोयरे' ही अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केली.

विशेष अधिवेशन बोलावून या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा अंतरवाली सराटीत (ता.अंबड,जि.जालना) उपोषणाला बसले. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व तज्ज्ञ त्यांना तपासण्यासाठी आल्यानंतर उपचाराला जरांगे पाटलांनी नकार दिला. अगदी विनवण्या करुनही त्यांनी घोटभर पाणी पिण्यासही नकार दिला.

दरम्यान, मंगळवारी त्यांच्या नाकातून रक्त आल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. नाक पुसत असलेल्या पांढऱ्या रुमालावर रक्ताचे डाग पडलेले होते. त्यामुळे अंतरवालीत पुन्हा एकदा गर्दी जमायला सुरुवात झाली. महिलांचीही मोठी उपस्थिती होती. पाणी प्या, उपचार घ्या.. अशी विनवणी मनोज जरांगे पाटील यांना सुरु होती.

मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून महिलांनी अक्षरश: हंबरडा फोडला. जरांगे पाटलांची तब्येत पाहून काही समन्वयकांनी श्रीक्षेत्र नारायणगडाचे (जि.बीड) मठाधिपती शिवाजी महाराज यांना निरोप केला. महाराज पोहोचले आणि त्यांनीही जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली. यानंतर व्यासपीठावर उपस्थित काही समाज बांधवांनी तुम्ही तुमचे नाहीत, समाजाचे आहात म्हणत त्यांचे हात-पाय घट्ट धरले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर व बीडच्या काही डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT