amit shah eknath shinde sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : शाहांनी संभाजीनगरची जागा हिसकावून घेतली, शिंदेंच्या मंत्र्यांचा नुसताच थयथयाट

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : 6 मार्च | मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेची ( Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha ) जागा कोण लढवणार? हे मंगळवारच्या जाहीर सभेत भाजपचे चाणक्य, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी स्पष्ट केले. मुळात शाह यांनी संभाजीनगरात प्रचार सभा घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच याचा अंदाज आला होता. ‘क्या आप संभाजीनगरसे एक कमळ मोदीजी को भेजेंगे क्या?’ असे आवाहन करत शाह यांनी ही जागा भाजपच लढवणार हे स्पष्ट करून टाकले. याची झलक शाहांच्या सभेच्या व्यासपीठावरही दिसली.

राज्यात महायुती म्हणून सत्तेवर असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, मंत्री, आमदारांनी शाह ( Amit Shah ) यांच्या सभेकडे पाठ फिरवली होती. ज्या मध्य विधानसभा मतदारसंघातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ही सभा झाली. त्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल वगळता सत्तेतील शिवसेनेचा एकही मंत्री, आमदार सभेकडे फिरकला नाही. पालकमंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांनी शाहांची हॉटेलमध्ये जाऊन भेट घेत भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देण्याचे सोपस्कार पार पाडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शाहांनी संभाजीनगरची जागा भाजप लढवणार, असे स्पष्ट संकेत दिल्यानंतर जसं काही आपल्याला काही माहितीच नाही, अशा आविर्भावात भुमरेंनी प्रतिक्रिया दिली. “संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे, ती शिवसेनाच लढवणार आणि जिंकणार,” असा जुनाच दावा संदीपान भुमरेंनी पुन्हा केला. शिवाय “आपण स्वतः लोकसभा लढवण्यास तयार” असल्याचे भुमरेंनी सांगितलं. “अमित शाहांची संभाजीनगरात सभा झाली म्हणजे ही जागा ते लढवणार असे होत नाही. मग मोदींनी यवतमाळमध्ये सभा घेतली, म्हणजे ती जागा भाजपच लढवणार असे होते का?” असा थयथयाटही भुमरे यांनी केला.

मुळात हा प्रकार म्हणजे साप निघून गेल्यानंतर काठी आपटण्यासारखा असल्याची टीका शिवसेनेवर आता होऊ लागली आहे. संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगणारे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, मंत्री काही दिवसांपासून गप्प होते? यावरून ही जागा शिवसेनेच्या हातून गेली, असा अंदाज व्यक्त केला जात होता. शाहांची मंगळवारी झालेल्या सभेनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

त्यामुळे गेली 35-40 वर्षे शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा कमळ चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे. शिवसेनेत बंड केल्यामुळे एकनाथ शिंदेंना अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या काही आमदारांना मंत्रिपदे मिळाली. पण, शिवसेनेच्या हक्काची जागा हातची गेल्याने तेलही गेले, तूपही गेले हाती राहिले धुपाटने, अशी शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था झाली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT