Shiv Sena UBT leader Ambadas Danve during political discussions ahead of Chhatrapati Sambhajinagar mayoral reservation draw, amid BJP majority and ST category uncertainty. Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : मतीनच्या घरावर बुलडोझर, अंबादास दानवे म्हणतात, युपी-बिहारची संस्कृती महाराष्ट्रात येऊ देणार नाही!

Matin Patel demolition News : युपी-बिहारमध्ये असलेली बुलडोझर संस्कृती महाराष्ट्रात येऊ देणार नाही, आम्ही त्याविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा दानवे यांनी दिला.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर महापालिकेच्या पथकाने बुधवारी पहाटे बुलडोझर फिरवला. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी मतीन पटेल यांच्या कुटुंबियांना अलिशान घर बांधून देण्याची घोषणा केली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनीही या कारवाईवर टीका केली. युपी-बिहारमध्ये असलेली बुलडोझर संस्कृती महाराष्ट्रात येऊ देणार नाही, आम्ही त्याविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा दानवे यांनी दिला.

महानगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आज नारेगाव येथील मतीन पटेल यांचे अनधिकृत घर मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाडले. एमआयएमने या कारवाई विरोधात गांधीगिरी करत मतीनच्या कुटुंबियांसह अतिक्रमण पथकावर फुलांचा वर्षाव केला. तसेच अधिकाऱ्यांना हार घालून संविधानाची प्रत दिली. दरम्यान, या कारवाईवर आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही संताप व्यक्त केला.

नाशिकच्या टिसीएसमधील निदा खानच्या कथीत धर्मांतर प्रकरणात तिच्यावर कायद्याने जो गुन्हा सिद्ध होईल तो होईल. मतीनने तिला आश्रय दिल्या प्रकरणी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली तरी आमचे काही म्हणणे नाही. परंतु अशा प्रकारे त्यांच्या घरावर बुलडोझर चालवून त्यांच्या कुटुंबियांना त्रास देणे चुकीचे आहे. या शहरात एकट्या मतीन पटेलचेच घर अतिक्रमित आहे का? असा सवाल करत दानवे यांनी भाजपच्या (BJP) अनेक नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या अतिक्रमणाची आपल्याकडे यादी असल्याचा दावा केला.

शहरातील सत्तर टक्के घर ही अतिक्रमित आहेत. गेल्या सत्तर वर्षात ती उभी राहिली आहेत. तेव्हा महापालिका झोपली होती का? तुमचे अधिकारी पैसे खाऊन अतिक्रमणांना संरक्षण देतात? मग इतर अतिक्रमणांवर कारवाई न करता मतीन पटेल याच्या घरावरच बुलडोझर कसा चालवला? इतर ठिकाणी कारवाईची हिंमत सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासन का दाखवत नाही? असा सवाल दानवे यांनी केला.

भाजपच्या एका नगरसवेकांनी तीन मजली घर अतिक्रमण करत बांधले, एका राजू खेडकर नावाच्या व्यक्तीची इमारत अनधिकृत आहे, त्याला भाजपच्या एका बड्या नेत्याचे सरंक्षण आहे. याशिवाय सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेते, पदाधिकारी, खासदार, आमदार, नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकाम, घरांची यादी माझ्याकडे आहे.

एखाद्यावर आरोप झाला म्हणून त्याच्या कुटुंबाचा विचार न करता त्यांना बेघर करणे चुकीचे आहे. युपी-बिहारमध्ये असलेली बुलडोझर संस्कृती कदापी या महाराष्ट्रात येऊ देणार नाही. या विरोधात येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात मी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT