

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : नाशिक येथील कथीत धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणारे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अधिकृत तीन मालमत्तांवर महापालिकेने बुधवारी (ता. 13) पहाटे बुलडोझर चालविला. नारेगावातील दोन घरे आणि एक कार्यालय महापालिकेने जमीनदोस्त केले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याने नारेगावला छवणीचे स्वरूप आले होते.
दरम्यान कारवाईसाठी आलेल्या पथकाचे मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी हार घालून, फुले उधळून स्वागत केले. पटेल यांच्या सहा वर्षाच्या मुलीने अधिकाऱ्याला घटनेची प्रत देऊन अशाच प्रकारची कारवाई सर्वत्र करावी, असे आवाहन केले. महापालिकेच्या कारवाईने शहरातील बेकायदा बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिक येथील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान आश्रय दिल्याने एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल चर्चेत आले होते.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्यांची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरुवात केली. मतीन खान यांच्या नारेगाव भागात अनधिकृत मालमत्ता कुठे आहेत, याचा शोध घेण्यात आला. हिना खानला आश्रय देणाऱ्या घरासह, खान यांचे कार्यालय, अन्य एक राहते घर आढळून आले. तिन्ही ठिकाणी मनपाने अवैध बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली. या तिन्ही मालमत्तांची गुंठेवारी केली आहे का? याचीही शहनिशा केली.
एकाही मालमत्तेची गुंठेवारी केलेली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तीन दिवसांची मुदत देणाऱ्या नोटीस चिटकवल्या. मंगळवारी सकाळी पुन्हा चोवीस तासांची मुदत देणाऱ्या नोटीस चिटकविण्यात आल्या. दरम्यान मतीन पटेल यांनी न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली नाही. त्यामुळे मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर बुधवारी कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली होती.
याची कुणकुण लागताच एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवक मंगळवारी रात्री नारेगाव भागात जमा झाले. पहाटेपर्यंत मोठा जमाव मतीन पटेल यांचे घर, कार्यालय परिसरात जमला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. असे असले तरी महापालिकेने बुधवारी पहाटे कारवाई करण्याचे सूक्ष्म नियोजन केले होते.
त्यानुसार पहाटे पाच वाजताच शेकडो पोलिसांसह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यंत्रणा गरवारे स्टेडीयम परिसरात जमा झाली. येथून साडेपाच वाजता हे पथक मतीन यांचे घर असलेल्या परिसरात पोचले. त्यानंतर सहा वाजेच्या सुमारास कारवाईल सुरुवात झाली.
हार घालून गांधीगिरी
महापालिकेच्या कारवाईनंतर अनुचित प्रकार घडेल, अशी शंका उपस्थित केली जात होती, पण कारवाईला विरोध न करता मतीन पटेल यांच्या पत्नीने अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह अधिकाऱ्यांचे फुलांचे हार घालून स्वागत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सहा वर्षाच्या मुलीने घटनेची प्रत देऊन शहरात सर्वत्र अशाच प्रकारची कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी तिला रडू कोसळले.
मतीन पटेल यांचे नारेगावच्या मुख्य रोडवर 2400 स्केअर फुटाचे घर होते. त्यात सहा दुकाने आठ ते दहा रुम होत्या. त्याला लागूनच 30 बाय 20 आकाराचे पत्र्याच्या शेडमध्ये कार्यालय होते. कौसर पार्क येथे 20 बाय 30 आकाराच्या भूखंडावर दोन मजली घर होते. याच ठिकाणी आरोपी निदा खान हिला आश्रय देण्यात आला होता. या तीनही मालमत्तांच्या बांधकामाची परवानगी नव्हती. त्यामुळे महापालिकेने तीनही बांधकामे जमीनदोस्त केली. सकाळी सहा ते साडेआठ वाजेच्या दरम्यान ही मोहीम फत्ते करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.