Parbhani News : सुरुवातीला कमी पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे पिके हातची गेल्याने बळिराजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे हे दुःख लोकप्रतिनिधींना समजावे; म्हणून परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील एका कार्यक्रमात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश वरपुडकर यांचा सडलेले धान्य देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार बंडू जाधवही उपस्थित होते. (MLA Suresh Warpudkar was welcomed with rotten grains)
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे गोदाकाठच्या रस्ता कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. 5 जानेवारी) करण्यात आले. त्या भूमिपूजन कार्यक्रमाला पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर आले होते. त्यावेळी शेतकरी संघटनेच्या विश्वंभर गोरवे, माधव जाधव, सोमनाथ नागूरे यांनी सडलेले कापूस, सोयाबीन व इतर पिके भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या वेळी खासदार संजय जाधव यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!
परभणी जिल्ह्यातील व विशेषतः सोनपेठ तालुक्यातील पिकांची परिस्थिती या वर्षी अतिशय बिकट आहे. यावर्षी तालुक्यात सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झाला नाही. तालुक्यातील पिकांची पैसेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे. या वर्षी सोयाबीन, कापूस या पिकांना सरासरी पेक्षाही कमी भाव मिळत आहे.
सोयाबीनला गेल्या वीस वर्षांपूर्वी इतकाच दर मिळत आहे. कापसाचे भावही पाच हजारांनी घटले आहेत. त्यातच गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे उभ्या कापसाचे व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी व सुलतानी संकटांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी लोकप्रतिनिधींना सडलेली पिके दिल्याचे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, अशा प्रकारच्या स्वागताची अपेक्षा नसल्याने लोकप्रतिनिधीही अचंबित झाले. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात विषय मांडणार असल्याचे आश्वासन आमदार सुरेश वरपूडकर यांनी दिले.
मराठा आरक्षण आंदोलनप्रसंगी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. अजूनही अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाच्या सामना करावा लागत आहे. त्यातच शेतकरी संघटनेने अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनामुळे पभरणी जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधून घेतले.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.