Dharashiv News : भूम- परंडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या नावाने मतदारसंघात सध्या बोंबाबोंब सुरू आहे. विधानसभा निवडणूक होऊन आठ ते नऊ महिने उलटून गेले आहेत, परंतु निवडून आल्यापासून तानाजी सावंत एकदाही मतदारसंघात फिरकले नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. मतदारसंघासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर पुण्यातच राहावा, असा सल्लाही मतदार त्यांना देत आहेत.
एकीकडे तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मतदारसंघात न येण्यामुळे रोष असला तरी गेल्या दीड दोन महिन्यापासून सावंत हे आजारी असल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले जाते. प्रकृतीचे कारण असले तरी निवडून आल्यापासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी आपला राग मतदारसंघावर काढू नये, अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे.
तानाजी सावंत यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष ही बाब नवीन नसून 2019 मध्ये त्यांनी मतदारसंघात कधीच फारशे लक्ष दिले नाही. (Shivsena) त्यामुळे जर मतदार संघाला वेळ देता येत नसेल, लोकांचे, शेतकरी, मजूर, तरुणांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मतदारसंघातून होऊ लागली आहे. दुसरीकडे तानाजी सावंत यांचे राजकीय विरोधक माजी आमदार राहुल मोटे यांनीही या निमित्ताने त्यांच्यावर तोंडसुख घेतले.
उद्योग-धंदे वाचवण्यासाठी निवडणूक लढले..
तानाजी सावंत यांनी केवळ आपले उद्योग-धंदे वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना मतदारसंघ आणि तेथील जनतेशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मी करत असल्याचे मोटे यांनी म्हटले आहे. एकूणच आमदार तानाजी सावंत यांच्याबद्दल मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असल्याचे दिसून येत आहे.
आपल्या मुजोर वक्तव्यांमुळे तानाजी सावंत अनेकदा अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही काळामध्ये त्यांच्या कुटुंबातील वादामुळे ते त्रस्त होते, अशीही चर्चा आहे. या सगळ्याचा परिणाम सावंत यांच्या प्रकृतीवर झाल्याचे बोलले जाते. गेल्याच महिन्यात अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तानाजी सावंत यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
गेल्या दोन महिन्यापासून प्रकृतीच्या कारणामुळे तानाजी सावंत मतदारसंघात गेले नसले तरी निवडून आल्यापासूनच ते भूम- परांड्यात आले नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील 2024 मधील महायुती सरकारमध्ये डच्चू देण्यात आला. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी फक्त मतदारसंघाकडेच दुर्लक्ष केली नाही तर पक्षाच्याही कार्यक्रमांकडे ते सातत्याने पाठ फिरवत असल्याचे दिसून आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.