Sanjay Jadhav, Mohan Phad Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Political : ठाकरे गटाच्या खासदाराला धूळ चारणे हेच महायुतीचे ध्येय..!

BJP election chief Mohan Phad is aggressive in the gathering : भाजपचे निवडणूक प्रमुख मोहन फड मेळाव्यात आक्रमक.

Prasad Shivaji Joshi

Parbhani Political : महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अजून स्पष्ट नाही. मात्र परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना निवडणुकीत पराभूत करणे, हेच महायुतीचे ध्येय असल्याचे माजी आमदार भाजपचे निवडणूक प्रमुख मोहन फड यांनी सांगितले. महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फड यांनी खासदार संजय जाधव आणि ठाकरे गटाला लक्ष्य करत जोरदार टीका केली. फड आजच्या मेळाव्यात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

खासदार संजय जाधव आणि फड यांच्यातील राजकीय मतभेद जिल्ह्यात सर्वश्रुत आहेत. जाधव हे दहा वर्षापासून खासदार आहेत. मात्र त्यांनी दहा गावांचा सुद्धा विकास केला नाही. त्यामुळे त्यांचा पराभव करणे हे एकमेव ध्येय असल्याचे मोहन फड म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दूर्राणी यांनी फड यांच्या आवाहनाला छेद देत कोणाला पाडण्यासाठी नाही तर महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत असे आवाहन केले.

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत मोहन फड यांनी पाथरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व विजय प्राप्त केला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पाठींबा जाहीर केला. तेव्हापासून फड हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक मध्ये आहेत. फड यांनी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोहन फड यांनी युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्याऐवजी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांना साथ दिली. तेव्हापासून जाधव व फड यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. दरम्यान, फड यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतही प्रवेश केला होता. मात्र तरीही जाधव - फड यांच्यातील संवादाची दरी कमी झाली नाही. उलट ती आणखी रुंदावली आणि राजकीय मतभेद अधिक गडद झाले.

अखेर मोहन फड यांनी शिवसेनेचा राजीनामा देत पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. पक्षाने नुकतीच त्यांची पाथरी विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली असून ते पाथरी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख दावेदार आहेत. माजी आमदार राष्ट्रवादीचे डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी बाबाजानी दूर्राणी यांचा नामोल्लेख करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ऐवजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असा उल्लेख केला.

यामुळे श्रोत्यामधून आठवण करून देताच डॉ. केंद्रे यांनी सारवासारव करताना सांगितले की, कालच भाजपच्या नेत्यांनी सांगितले की, काही दिवसातच मोठा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामुळे कोण कुठे आहे हे कळायला मार्ग नाही. त्यांच्या या मिश्किल टिप्पणीने व्यासपीठावरील नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही हसू आवरले नाही.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT