MP Omprakash Rajenimbalkar  sarkarnama
मराठवाडा

MP Omprakash Rajenimbalkar News : '...तर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायला वेळ लागणार नाही', ओमराजेंचे कृषीदिनालाच मोठं विधान

Jagdish Pansare

Omprakash Rajenimbalkar News : कृषी प्रधान असलेल्या आपल्या भारत देशात 70 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी जगला आणि त्याची शेती जर फायद्याची झाली तर आपल्या देशाला जगातील तिसरी अर्थव्यवस्था व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात धाराशिवचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कृषीदिनाच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांना शुभेच्छा देतानाच ओमराजे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका केली. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात 70 % लोक हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकरी जगला आणि शेतकऱ्यांची शेती जर फायद्याची झाली तर जगातील 3 नंबरची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारत देशाला वेळ लागणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाचे भाव पाडण्याचे धोरण स्वीकारण्यापेक्षा शेतकऱ्याला शेतीतून उत्पन्न कसे मिळेल याकडे केंद्रसरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असा टोला ओमराजे यांनी लगावला.

राज्यातील महायुती सरकारचे विधीमंडळाचे शेवटचे पावसाळी अधिवेशन मुंबईत तर दिल्लीत एनडीए सरकारचे पहिले संसद अधिवेशन सुरू आहे. राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला वर्गावर लक्ष केंद्रीत करत विविध योजनांच्या घोषणा केल्या आहेत. तर तिकडे केंद्र सरकारकडून आश्वसने दिली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.

कधी दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी तर कधी शेतमालाचे पडलेले भाव अशा दृष्टचक्रात शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून भरडला जात आहे, असे ओमराजे Omprakash Rajenimbalkar म्हणाले.

हमीभाव देण्याच्या गप्पा दोन्ही सरकारे करतात पण शेतकऱ्याच्या हातात मात्र तो कधीच पडत नाही. अशा अनिश्चिततेमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. राज्यातील महायुती सरकारही त्यात आपल्यापरीने योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.

परंतु कृषीप्रधान आणि सत्तर टक्के लोकांचा व्यवसाय शेती असतांना या क्षेत्राकडे अजूनही सरकार गांभीर्याने पहायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे. तिकडे राजधानीत शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आहे, तर इकडे महाराष्ट्रात दररोज सरासरी सात शेतकरी नापिकी, शेतमालाला भाव नाही, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या करत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो आहे.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्रात हरितक्रांतीचे जनक दिवगंत वसंतराव नाईक यांच्या गावातून संपुर्ण राज्यात आजपासून कर्जमुक्ती आंदोलनाला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर व कृषीदिनाचे औचित्य साधत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देतानाच केंद्र सरकारचे कान टोचले आहेत.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT