Shivaji Kalge Moring Walk sarkarnama
मराठवाडा

MP Dr Shivaji Kalge News : लोकसभेला भाजपच्या शृंगारेंना ज्याचा फटका, त्यातून घेतला धडा! काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदाराचा खास 'लातूर पॅटर्न'

Congress Shivaji Kalge ​​different style of work :लातूरकरांनी पहिल्याच प्रयत्नात काळगे यांना दिल्लीची वारी घडवल्यानंतर ते ही झपाटून कामाला लागल्याचे चित्र आहे. व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्यांच्या काम करण्याची स्टाईलही हटकेच असल्याचे दिसते.

Jagdish Pansare

Shivaji Kalge News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काही धक्कादायक निकाल लागले. लोकसभेच्या लातूर मतदारसंघातील भाजपचा पराभव हा त्यापैकीच एक. काँग्रेस महाविकास आघाडीने उच्चशिक्षित, नवा चेहरा म्हणून उमेदवारी दिलेल्या डाॅ. शिवाजी काळगे यांना लातूरकरांनी दिल्लीत पाठवले. पहिल्याच प्रयत्नात काळगे विजयी झाल्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्षालाही कमबॅक करण्याची संधी मिळाली.

लातूरकरांनी पहिल्याच प्रयत्नात काळगे यांना दिल्लीची वारी घडवल्यानंतर ते ही झपाटून कामाला लागल्याचे चित्र आहे. व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्यांच्या काम करण्याची स्टाईलही हटकेच असल्याचे दिसते. नियमित माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या काळगे यांनी आता यातूनच नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. खासदारांच्या या खास 'लातूर पॅटर्न'चे कौतुक होत आहे.

माजी खासदार श्रृंगारे यांचा नागरिकांशी संपर्क नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती. मात्र, याबाबतीत नवनिर्वाचित खासदार काळगे Shivaji Kalge हे वेगळे ठरले आहेत. शासकीय बैठका, अधिकाऱ्यांशी संवाद साधूनही ज्या गोष्टी समोर येत नाहीत, त्या सर्वसामान्य नागरिकांशी नेतेगिरी किंवा खासदार पदाचा बडेजाव न दाखवता केलेल्या चर्चेतून कळत असल्याचा अनुभव सध्या काळगे यांना येतो आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल भागात भल्या पहाटे पासून लातूरकर मोठ्या संख्येने वॉकिंग आणि व्यायामासाठी येत असतात. खासदार काळगे हे त्यापैकीच एक.

लोकसभेची निवडणूक जिंकून खासदार होण्यापूर्वीही ते जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माॅर्निग वाॅक, व्यायामासाठी जायचे. आता जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून दिल्ली किंवा राज्यात कुठे दौऱ्यावर असले तरी लातूरमध्ये असल्यावर नियमित चालणे आणि व्यायामाचा शिरस्ता काळगे यांनी कायम ठेवला आहे.

नुकतीच त्यांनी नियमित वाॅक आणि व्यायामासाठी जिल्हाधिकारी, व क्रिडा संकुल परिसरात येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक लातूरकर नागरिकांची समस्या सुटली पाहिजे, असा आपला कायम प्रयत्न असेल, लवकरच त्यांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, असा शब्द खासदार काळगे यांनी यावेळी दिला.

`अब की बार, डाॅक्टर खासदार` असे घोष वाक्य घेऊन काँग्रेस महाविकास आघाडी यावेळी लोकसभेच्या मैदानात उतरली होती. मित्र पक्षांच्या मदतीने काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीची लातूर लोकसभा मतदारसंघातील हॅट्रिक तर रोखलीच, पण पंधरा वर्षानंतर जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसचा खासदार निवडून आणला.

खासदार काळगे यांच्याकडून लातूरकरांना खूप अपेक्षा आहेत. कामाला त्यांनी सुरुवात केली आहे. लातूरकरांच्या पाणी प्रश्नासह, शहरातील स्वच्छता जिल्ह्यातील रस्ते, वीज, सिंचन, रोजगार, उद्योग अशा सगळ्याच क्षेत्रात ते कशी कामगिरी करतात याकडे लातूरकरांचे लक्ष असणार आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT