Latur Rural News : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांनी केले होते. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात निवडून येतांना काँग्रेसकडून आपल्याला कसा त्रास दिला गेला, याचा पाढाच मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. माझा लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा तिरंगा झेंडा लावण्यासारखा असल्याचे खळबळजनक विधान कराड यांनी केले.
गेल्या पंधरा वर्षापासून लातूर ग्रामीण मतदारसंघावर काँग्रेसचे पर्यायाने अमित देशमुख, धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांचे वर्चस्व होते. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने इथे रमेशअप्पा कराड यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसच्या धीरज देशमुख यांचा पराभव केला. त्यांनतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळात मतदारसंघात किती राजकीय दबाव होता हे सांगताना आम्हाला सतरंज्या मिळत नव्हत्या, सभेला लोक येत नव्हते, आम्हाला रामराम करणाऱ्यांचा ऊस वाळवला जात होता, असा आरोप करत अप्रत्यक्षरित्या धीरज, अमित देशमुख भावांवर तोफ डागली.
रमेशअप्पा कराड यांच्या या भाषणाची आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याची लातूर (Latur) जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे. कराड यांनी आपल्या प्रास्ताविकात 2014 मध्ये लातूर जिल्ह्यातील चौंडीच्या सभेत देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा गोपीनाथ मुंडेंनी केल्याची आठवण सांगीतली. आज हजारो नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री त्यांनी घडवले. देवेंद्रजी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आणि विधानसभेची उमेदवारी दिली. रेणापूरची सेवा करण्याची संधी तुमच्यामुळे मला मिळाली. मुंडेसाहेबांनी नेतृत्व केलेल्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला मिळाले. 2017 मध्ये आम्ही लातूर जिल्हा झिरो टू हिरो केल्याचे सांगीतले.
मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीणमधील जनतेनं करून दाखवलं. माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला. हा मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे. आमच्या मतदारसंघात संतरजी मिळत नव्हती, सभेला माणूस मिळत नव्हता, आम्हाला रामराम करणाऱ्याचा ऊस वाळवला जात होता. देवाभाऊ आमचे काही दुःख आहे, त्यासाठी तुम्ही मार्ग काढू शकता, तेवढं तुम्ही करायला पाहिजे, अशी माझी विनंती आहे. माझ्या मतदारसंघातील कामे फार काही मोठी नाहीत. रेणापूरच्या विकासाचे मुंडेसाहेबांनी पाहिले स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, असे रमेश कराड म्हणाले.
काँग्रेसवाल्यांनी एक टोपलं मुरूमही टाकला नाही..
मुंडेसाहेब गेले तेव्हापासून माझ्या रेणापूरमध्ये एक मुरूमाचं टोपलं देखील या काँग्रेसवाल्यांनी टाकलं नाही. अतिशय दयनीय अवस्था आमच्या ग्रामीण रस्त्यांची आहे. एमआयडीसी, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तहसिल, कोर्ट कार्यालयांची दुरावस्था आहे, त्यासाठी नवी इमारत होणे आवश्यक आहे. आपल्या खात्यांतर्गत पोलीस स्टेशनसाठी वसाहत याला मंजूरी द्यावी, अशी मागणी कराड यांनी यावेळी केली.
लातूर तालुक्यात मरुड मोठं गाव आहे, तिथली ग्रामपंचयात आपल्या ताब्यात आहे. पाणीपुरवठा योजना आपणच मंजूर केली. या गावाला तालुका करून नगरपरिषद करावी ही आमची इच्छा आहे. आरोग्य केंद्रांना दर्जा वाढ करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी करतानाच तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही रमेश कराड यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.