Latur News : नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व आणि हिंमत असलेले लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पाहीलेले स्वप्न, सामाजिक न्यायाचे धोरण यावर मी आणि आपले सरकार काम करत आहोत. ज्यांच्या वाट्याला सत्ता असताना आणि सत्ता नसतानाही संघर्ष आला, त्या गोपीनाथराव मुंडेसाहेबांची शिकवण मोलाची ठरते. मला खूप जवळून त्यांच्यासोबत काम करायला मिळालं. मी लहान असल्याने ते खूप काम सांगायचे, त्यातून मला शिकता आले. ते मला सांगायचे देवेंद्र एक लक्षात ठेव, सत्ता आपल्याला अमिष दाखवते, वश करण्याचा प्रयत्न करते. पण सत्तेशी संघर्ष करायला शिक, कधी सत्तेशी समझोता करू नको. ही शिकवण मी पाळली, कधी सत्तेशी समझोता केला नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत केलेल्या कामाच्या आठवणी, त्यांचा संघर्ष, दिलेली शिकवण, पाहिलेली स्वप्न या सगळ्याबद्दल देवेंद्र फडणवीस भरभरून बोलले. नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व आणि हिंमत असलेला नेता अशी गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. आज एकीकडे त्यांचा तर दुसरीकडे विलासराव देशमुख यांचा पुतळा आहे. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकनेते म्हणून मोठी लोकप्रियता मिळवली.
या स्मारकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही मित्र एकत्र आले आहेत. या दोघांची मैत्री महाराष्ट्राला परिचित आहे. संघर्षातून वाटचाल करत पसतीसाव्या वर्षी वर्षी गोपीनाथराव भाजपाचे अध्यक्ष झाले. संघर्ष करणारा तरूण म्हणून त्यांना संधी देण्यात आली. त्यांनतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. राज्यात पक्षाचे संघटन उभे करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे होते. वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून त्यांनी संघर्ष केला. विरोधी पक्षनेता कसा असावा? याचे उदाहरण देताना गोपीनाथ मुंडे यांचे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. मुगलांना जसे संताची-धनाजी पाण्यात दिसायचे तसे नव्वदच्या दशकात तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना स्वप्नातही गोपीनाथ मुंडे दिसायचे, असे सांगत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अंडरवल्डच्या दहशतीतून महाराष्ट्राला मुक्त केले..
आज विरोधक आरोप करताना हवेत बार सोडतात. गोपीनाथ मुंडे यांनी तसे कधी केले नाही. 1990 मध्ये जेव्हा मुंडेसाहेब विरोधी पक्षनेते होते, जेव्हा ते सभागृहात आरोप करायचे तेव्हा समोरच्याचा राजीनामा घेऊनच खाली बसायचे, असे त्यांचे काम होते. महाराष्ट्रात दाऊदचा बोलबाला होता तेव्हा सभागृहात उभं राहून त्याला आव्हान देण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्याकाळात त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले. 1995 ला संघर्ष यात्रा काढली आणि उभा महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढला. यात्रेला एवढा प्रतिसाद मिळायचा की अख्खे गाव रिकामं व्हायचं. तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी असे काही रान पेटवलं की राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले.
या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते. राजकारणातील गुन्हेगारीकरण वाढत असताना मुंबईतील गुंडाराज, अंडरवल्डची दहशत रोखण्यासाठी मकोका सारखा कायदा गोपीनाथ मुंडे यांनीच आणला. महाराष्ट्राला अंडरवल्डच्या दहशतीतून मुक्त करणारा गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे ओळखले जातात. सरकार नसतानाही मुंडेसाहेबांनी संघर्ष सोडला नाही. पंधरा वर्ष पदावर नसताना मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त रूबाब गोपीनाथ मुंडे यांचा होता. ते सरकारचं सालटं काढायचे, सभागृहात मुंडेसाहेब उभे राहिले की सभागृह शांत बसून त्यांचे भाषण ऐकायचे. मुंडे विरोधी पक्षनेते होते, पण ते जबाबदार नेते होते, त्यांनी सभागृहाची पत कधी घसरू दिली नाही, अशी आठवण देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून सांगीतली.
गोपीनाथ मुंडेंनी सामाजिक न्यायाची मोट बांधली..
सभागृहात थेट आरोप करणारे गोपीनाथ मुंडे यांचा आत्मविश्वास इतका दांडगा होता, की कधी कधी त्यांना पुराव्याचा कागद सापडला नाही तर हातात कोरा कागद घेऊन हा माझ्या हातात तुमच्याविरोधातला पुराव आहे, असं ते ठणकावून सांगायचे. मुंडे साहेबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष वाढवला. सामाजिक न्यायाची कास त्यांनी कधी सोडली नाही. त्यांना राजकारणात अडचणी सोसाव्या लागल्या. मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराचा विषय आला तेव्हा, गोपीनाथ मुंडे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले पाहिजे असा, आग्रह धरला. त्यानंतर त्यांना राजकारणात याचे परिणाम भोगावे लागले, पण ते ठाम राहिले.
सामाजिक न्यायाची मोट गोपीनाथ मुंडे यांनी बांधली म्हणून आज वंचित, सामान्य लोक आमदार झालेले दिसतात. ते ओबीसींचेही नेते आहेत, एखाद्या समाजाचं कल्याण झालं पाहिजे, त्यासाठी दुसऱ्या समाजाचा दुस्वास करण्याची गरज नाही. सगळ्या समाजाचे कल्याण करण्याची भावना गोपीनाथ मुंडे यांनी जोपसली ती आजच्या राज्यकर्त्यांना समजवून घेण्याची गरज असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. लोकसभेत मुंडेसाहेब गेले तेव्हा ते उपनेते झाले. महाराष्ट्रातून दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी तिथेही आपली चूणूक दाखवली.
ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांना अधिक काळ मिळाला असता तर या देशाचे नेते म्हणून आपण त्यांना पाहू शकलो असतो. तेव्हा आम्ही मोदीजींना सांगितलं होतं, उधारीवर गोपीनाथराव यांना तुम्हाला दिले आहे, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करणार होतो, पण ते स्वप्न आम्हाला पूर्ण करता आले नाही. गोपीनाथराव मुंडे यांचा सातत्याने ज्या गोष्टीसाठी आग्रह असायचा त्या सगळ्या गोष्टी आम्ही आज करतोय. मराठवाड्याला हक्काचा सात टीएमसी पाणी आपण परत आणलं. बीड जिल्ह्यापर्यंत ते पोचतयं. गोदा परिक्रमा त्यांनी केली, आता आपण मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचं स्वप्न पूर्ण करत आहोत. नगर-बीड-परळी रेल्वेचे काम पूर्ण होत आहे. त्यांचे हे स्वप्नही पूर्ण करू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
लातूर पाणीपुरवठा योजनेला मान्यता..
लातूर येथील रेल्वेकोच फॅक्टरीचा आढावा घेतल्याचे सांगताना आतापर्यंत एक हजार तरुणांना काम दिले आहे. लवकरच दहा हजार तरुणांना काम मिळेल. स्थानिकांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, हे मी पुन्हा सांगीतले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 291 कोटींची पाणीपुरवठा योजना, सामान्य रुग्णालयाला आजच मान्यता देतो, असे सांगत तशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून केली.
गोपीनाथ मुंडे यांचे प्रेम बीडप्रमाणे लातूर आणि मराठवाड्यावर होतं. त्यामुळे तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले. संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार यांचेही त्यांनी कौतुक केले. येत्या पाच वर्षात शंभर टक्के शेत रस्ते पक्के करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. शिवेंद्रसिंह राजे याच्या रूपाने सक्षम पालकमंत्री आम्ही दिला आहे. लातूरकरांची सगळी स्वप्न आम्ही पूर्ण करू, मुंडेसाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही वाटचाल करत आहोत. त्यांचे स्वप्न पूर्ण करू, असा शब्द देखील फडणवीस यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.