Nanded BJP News Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP News : नांदेड भाजपमधील गटबाजी मोडून काढण्यासाठी बावनकुळे सरसावले..

Laxmikant Mule

Marathwada Political News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी `मिशन 45` घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपला नांदेड लोकसभा मतदारसंघात गटबाजीचे ग्रहण लागले आहे. (Nanded BJP News) विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याबद्दल जिल्ह्यातील भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याने आता याची दखल घेत राज्यातील नेतृत्वानेच यात लक्ष घातले आहे.

खासदार चिखलीकरांनी (Pratap Patil Chikhlikar) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या आढावा बैठकीत नायगांवचे आमदार राजेश पवार यांच्याविरोधातच तक्रारी करण्यात आल्या. शिवाय अनेक पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलावण्यात आले नव्हते. आधीच भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये डेंजर झोनमध्ये असलेली (Nanded) नांदेडची जागा कशी राखायची ? यावर राज्यस्तरावर मंधन सुरू आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला बेबनाव यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हेच शेवटचा घाव घालण्याची शक्यता आहे.

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे जिल्हानिहाय बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत. नियोजित दौऱ्या प्रमाणे ते उद्या, दि. 21 रोजी नांदेडला येणार असल्याचे सांगितले जाते. या दौऱ्यात पक्षातील गटबाजीबाबत प्रदेशाध्यक्ष कोणाचे कान टोचणार? लोकसभा निवडणुकीत विजय मिळण्यासाठी कोणता कानमंत्र देतात ? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातून चाळीसहून अधिक खासदार निवडून पाठवण्याचे शिवधनुष्य भाजपच्या नेत्यांना पेलावे लागणार आहे. गेल्यावेळी प्रताप पाटील चिखलीकर हे निवडून आले होते. पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकारणात बराच‌ उलटफेर झाला आहे. पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाली आहे. ही जागा `सेफ झोन` मध्ये कशी येईल व त्यासाठी काय करावे लागणार ? यावर बावनकुळे आढावा बैठकीत चर्चा करण्याची शक्यता आहे.

गेल्या दहा वर्षात विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्याचे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. दुसऱ्या पक्षातुन‌ येणाऱ्यांना पदे देतांना जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तक्रार असते. तर नव्याने दुसऱ्या पक्षातुन आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या पदाच्या अपेक्षेने पक्षात आलेले असता. नव्या-जुन्यांचा समतोल साधतांना पक्षाच्या नेत्यांची दमछाक होते. या व इतर कारणांमुळे पक्षात नव्या-जुन्यांचा वाद नेहमीच चर्चेचा विषय असतो.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या बैठकीत नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांना टार्गेट करण्यात आले होते. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. त्यामुळे नांदेडची जागा पुन्हा जिंकायची असेल तर पक्षातील गटबाजीला आवार घालून जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सरसावले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT