Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar sarkarnama
मराठवाडा

Nanded Lok Sabha Constituency : चिखलीकर-चव्हाण जोडीला महाविकास आघाडीचा 'दे धक्का'?

Political News : लोकसभेच्या नांदेड मतदारसंघासाठी शुक्रवारी 65 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान चार टक्क्यांनी घसरले असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी महायुतीच्या अशोक चव्हाण- चिखलीकर या जोडीला चांगलाच घाम फोडल्याचे दिसून आले.

Jagdish Pansare

Nanded News : लोकसभेच्या नांदेड मतदारसंघासाठी शुक्रवारी 65 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान चार टक्क्यांनी घसरले असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी महायुतीच्या अशोक चव्हाण- चिखलीकर या जोडीला चांगलाच घाम फोडल्याचे दिसून आले. भाजपच्या 400 पार मध्ये प्रताप चिखलीकर यांचा नंबर वरचा असेल, असा दावा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केला होता.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप (Bjp) प्रवेशानंतर जिल्हा काँग्रेसमधून सुरू असलेले इन्कमिंग पाहता नांदेड लोकसभेची निवडणूक एकतर्फी होणार अशी चर्चा होती. परंतु प्रत्यक्ष मतदान पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांनी चिखलीकर-चव्हाण जोडीला नाकीनऊ आणल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांना त्यांच्याच भोकरसह जिल्हाभरात मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

मराठा आंदोलकांनी सभा रोखत चव्हाण-चिखलीकर यांना जाब विचारत मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते. या सगळ्यांचा परिणाम लोकसभेच्या मतदानावर झाल्याचे दिसून येत आहे. महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ आपल्याला होईल, असा लावलेला अंदाजही फोल ठरताना दिसत आहे.

प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी स्वतः अशोक चव्हाण, भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछेडे, माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांच्यासह त्यांच्या टीमने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये सभा घेत वातावरण निर्मिती केली. यानंतरही सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक वसंत चव्हाण यांनी दिलेल्या जोरदार झुंजीमुळे रंगतदार वळणावर पोहोचली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीआधी छातीठोकपणे विजयाचा दावा करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी आता सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. वसंत चव्हाण यांच्यासाठी काँग्रेसच्या देशपातळीवरील एकाही मोठ्या नेत्याने सभा घेतलेली नसताना नाना पटोले, अमित देशमुख या नेत्यांच्या भरवशावरच वसंत चव्हाण यांनी निवडणूक लढवली. मात्र, अनपेक्षित पणे त्यांनी अशोक चव्हाण, विद्यमान खासदार व नांदेड महायुतीचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांना जेरीस आणण्याचे चित्र आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने ही लढत सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटत होती. पण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वसंतराव चव्हाण यांना मराठा, मुस्लिम व दलित मतदारांचा पाठिंबा मिळाल्याने ही लढत चुरशीची झाली.अशोक चव्हाण यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विजयाची गॅरंटी घेतली होती. त्यामुळे त्यांनी प्रचारात प्रमुख जबाबदारी पार पाडली. पण त्यांनी त्यांच्याच भोकर विधानसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाच्या तरुणांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यांना पोलिस बंदोबस्तात सभा घ्याव्या लागल्या. काँग्रेसचे पारंपरिक मतदार पुन्हा एकदा पक्षाच्या पाठीशीे भक्कमपणे उभे राहिल्याचे बोलले जाते.

ओबीसी मतदारांनी महायुतीला साथ दिल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत नायगाव, देगलूर, मुखेड या तीन मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाला खूप मोठे मताधिक्य मिळाले होते. या तीन मतदारसंघांवर चिखलीकर यांचे भवितव्य अवलंबून आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. याच फटाका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

1989 च्या लोकसभा निवडणुकीची होणार पुनरावृत्ती

नांदेड लोकसभा मतदारसंघातून 1989 ला डॉ. व्यंकटेश काब्दे हे फारसे परिचित नसताना निवडून आले होते. त्यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. तशीच परिस्थिती या निवडणुकीत दिसून आली. काॅंग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांची फारशी निवडणूक यंत्रणा नसतानाही त्यांना मतदारसंघात खूप मोठे समर्थन मिळाले आहे. आता ते महायुतीला नांदेडमध्ये धक्का देतात का? याची संपूर्ण राज्याला उत्सुकता असणार आहे.

(Edited By : sachin waghmare)

R

SCROLL FOR NEXT