Nanded Waghala Municipal Corporation News : नांदेड-वाघाळा महापालिकेत खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने बहुमत मिळवले. कधीकाळी काँग्रेसची कायम सत्ता राहिलेल्या नांदेड महापालिकेत पहिल्यादांच कमळ फुले. परंतु या निवडणुकीत बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा पुरेपूर फायदा उचलत अशोक चव्हाण यांनी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना आपल्या बाजूने वळवले होते. कल्याणकर यांचे त्यांच्या मतदारसंघात 'कल्याण' व्हावे, अशीच त्यांची भूमिका राहिली.
दुसरीकडे शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते आणि अशोक चव्हाणांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या आमदार हेमंत पाटील यांनी आमदार आनंद बोंढारकर, बाबुराव कदम यांना हाताशी घेऊन वेगळीच भूमिका घेतली. अशोक चव्हाण यांच्यासोबत युती न करता हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत हातमिळवणी केली. पण त्यांच्या हाताला काहीच लागले नाही.
याउलट बालाजी कल्याणकर यांना मानणारे चार नगरसेवक निवडून आले आणि त्यांनी निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या आमदारांकडून झालेल्या त्रासाचा वचपा भाजपला विनाअट पाठिंबा जाहीर करून काढला. अर्थात या न मागता दिलेल्या पाठिंब्याचा भाजपच्या शतप्रतिशत सत्तेत बालाजी कल्याणकर यांना कितपत फायदा होईल, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. परंतु 'पाणी मे रहेके मगरमच्छ से बैर नही' ही भूमिका आमदार कल्याणकर यांची दिसते.
नांदेड-वाघाळा महापालिकेत अशोक चव्हाण यांना शिवसेनेला (Shivsena) सुरवातीपासूनच सोबत घ्यायचे नव्हते. परंतु राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी युती करा, असे आदेश दिल्याने अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला कमी जागा देऊ करत युती होणारच नाही, याची काळजी घेतली. हेमंत पाटील, आनंद बोंढारकर, बाबुराव कदम या युतीतील आपल्या विरोधकांना बाजूला ठेवत बालाजी कल्याणकर यांना मदतीची खेळी अशोक चव्हाण यांनी केली. सत्तेत संख्याबळ कमी पडले तर काय? यासाठी केलेली ही तजवीज होती, हे आता स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले, पण त्यांच्या पाठिंब्याची भाजपला सत्तेसाठी गरजच पडली नाही. 66 जागा लढवत भाजपने 45 जिंकल्या आणि बहुमताचा जादुई आकडा कोणत्याही कुबड्यांशिवाय गाठला. बालाजी कल्याणकर यांच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंड करणाऱ्यांना हेमंत पाटील, कदम, बोंढारे यांनी बळ देण्याच प्रयत्न केल्याने कल्याणकर कमालीचे संतापले होते. त्यामुळे नांदेडमध्ये शिवसेनेत आता उघड उघड दोन गट तयार झाले आहेत. पैकी बालाजी कल्याणकर यांनी अशोक चव्हाण यांच्याशी जुळवून घेत विनाअट भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. एकूण काय तर शिवसेनेची नांदेडमध्ये फरपट सुरू झाली आहे.
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेत महायुती म्हणून एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला आहे. दोन्ही पक्षांच्या प्रदेश नेतृत्वाच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला असून, शिवसेनेच्या 4 नगरसेवकांनी भाजपला विनाअट पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुती म्हणून नांदेड महानगरपालिकेतील आमचे संख्याबळ आता 49 झाले आहे. यातून शहराच्या विकासाचे निर्णय अधिक खंबीरपणे व जलदगतीने घेणे शक्य होईल, असे अशोक चव्हाण यांनी विनाअट पाठिंब्यावर बोलतांना सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.