Amravati News : महायुतीचे सरकारमध्ये निधीवाटपावरून सातत्याने खटके उडत आहेत. अजित पवार यांना महायुतीत घेण्यास शिंदे सेनेने याच कारणासाठी विरोध केला होता. आता निधी वाटपाचे भांडणे जिल्हा पातळीवर पोहचू लागली आहेत. त्यावरून महायुतीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यात महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (शिंदे) पक्षाला जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटपात डच्चू देण्यात आला आहे. भाजपच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक व भावी उमेदवारांना मात्र खिरापत वाटण्यात आली. मित्रपक्षांमध्ये यामुळे असंतोष उफाळला असून त्याचे पडसाद मनपा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
निधी वाटपाच्या माध्यमातून भाजपने (BJP) मनपा निवडणूक स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेस 16 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचे वाटप भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी सुचविलेल्या कामांसाठी करण्यात आले आहे.
सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत. निधी वाटपात शहरातील महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेसाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले असले तरी उर्वरित सर्व निधी भाजपच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांसाठी वळविण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे निधीवाटप करण्यात आला आहे. महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिंदे गटाला या निधीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांना निधी देण्यात आला आहे. नवनीत राणा भाजपच्या सदस्या असल्या तरी त्यांचे मूळ युवा स्वाभिमान पक्ष आहे.
निधी वाटपात स्थान न मिळाल्याने महायुतीमधील मित्रपक्षांत धुसफुस सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपने या माध्यमातून आगामी महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही मित्रांना दूर ठेवण्याचा पहिला टप्पा पूर्ण केला असून स्वबळाचे संकेतही दिले आहेत, त्यामुळे मित्रपक्षांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे.
यांना दिला निधी
भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) , माजी खासदार नवनीत राणा, माजी आमदार प्रवीण पोटे यांच्यासह माजी शहराध्यक्ष किरण पातूरकर, जयंत डेहनकर, विद्यमान जिल्हा शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, महामंत्री बादल कुलकर्णी, शहर जिल्हा सचिव वीरेंद्र ढोबळे, महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष सविता ठाकरे, युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस ऋषीकेश देशमुख, माजी महापैार चेतन गावंडे, माजी सभापती तुषार भारतीय, जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) विवेक गुल्हाने, माजी नगरसेवक आशिष अतकरे, संगीता बुरंगे, माजी उपमहापौर संध्या टिकले, माजी सभापती विवेक कलोती, माजी नगरसेवक चेतन पवार, सुनंदा खरड.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.