Latur Politics News : नीट पेपर फुटीप्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या लातूर पॅटर्नला डाग लागल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे. सीबीआयने पेपरफुटीच्या प्रकरणात प्रा.शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर याचे राजकीय पडसाद लातूरमध्ये उमटू लागले आहेत. भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या सोशल मिडिया पेजवरून केलेल्या पोस्टवर काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे हे व्यक्त झाले आहेत.
काँग्रेस-भाजपामध्ये या प्रकरणावरून वादावादी सुरू झाली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या पोस्टनंतर काँग्रेसकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अभिमन्यू पवार यांनी खासदार साहेब, नीट पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या एकाचीही गय केली जाणार नाही. नीट पेपरफुटीप्रकरण हे अत्यंत गंभीर आहे, पण नेहमीप्रमाणे काँग्रेस पक्षाने या विषयातही राजकारण सुरु केले आहे. अज्ञानातून काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी काही आरोप केले ठीक, पण मोटेगावकर हे कोण्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत याचे संपूर्ण ज्ञान असूनही लातूरचे खासदार डॉ शिवाजीराव काळगे यांनीही तेच करावे याचे थोडे आश्चर्य वाटले.
नीट पेपरफुटी प्रकरणी काहीही कार्यवाही होत नाही असा आरोप खासदार साहेबांनी केला आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असलेले मोटेगावकर यांच्यासह पेपरफुटी प्रकरणी सहभागी असलेल्या 10 पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. खासदार साहेब, मोटेगावकरांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत उघडपणे काँग्रेस पक्षाचा प्रचार केला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाने याप्रकरणी आरोपाचे राजकारण करणे केवळ आश्चर्यकारक नाही तर हास्यास्पद सुद्धा आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी निष्पक्ष चौकशी सुरु असून 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, मग तो कोणत्याही पक्षाशी संबंधित असो. शाहू कॉलेज, दयानंद महाविद्यालय, केशवराज विद्यालय, देशिकेंद्र विद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर या व अशा अनेक संस्थांनी कष्टातून विकसित केलेल्या लातूर पॅटर्नला डागाळण्याचे काम नीट पेपरफुटी प्रकरणाने केले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात न अडकता घडलेल्या प्रकरणाचे चिंतन करून योग्य त्या सुधारणा घडवून आणण्याचे काम लातूरकर म्हणून आपण सर्वांनी करायला, हवे असे मला वाटते, अशा शब्दात अभिमन्यू पवार यांनी मोटेगावकर यांचा संबंध थेट काँग्रेसशी जोडला.
अभिमन्यू पवार यांच्या पोस्टवर खासदार काळगे यांनी उत्तर देताना नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावर आपण व्यक्त केलेली चिंता मी समजू शकतो, पण या अत्यंत गंभीर आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या विषयाला नेहमीप्रमाणे 'काँग्रेस विरुद्ध भाजप' अशा राजकीय चष्म्यातून पाहण्याचा आपला हा प्रयत्न दुर्दैवी नाही का? असा सवाल केला आहे. लातूरचा खासदार म्हणून माझी बांधिलकी कोणत्याही एका व्यक्तीशी नसून, लातूरच्या आणि देशाच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांशी आहे.
पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले कोणीही असोत ,गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष अशा गुन्हेगारांचे कधीही समर्थन करणार नाही. नीट परीक्षा ही केंद्र सरकारच्या 'एनटीए' (NTA) या संस्थेमार्फत घेतली जाते. गेल्या अनेक वर्षापासून पेपर फुटी प्रकरणे अनेक राज्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेले आहेत. मग तो राजस्थान असो मध्य प्रदेश असो देशभरात हे पेपर फुटले आहेत, गेल्या काही वर्षापासून नीट परीक्षा प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला नाही का?
हे सत्य आपण का नाकारत आहात? मूळ विषयावरून लक्ष भरकटवण्यासाठी स्थानिक पातळीवर राजकारण कोण करतंय? हे लातूरची सुज्ञ जनता उघडपणे पाहत आहे. आपण केंद्रीय यंत्रणांचे अपयश लपवण्याचा प्रयत्न का करत आहात? 2014 पासून आजतागायत भारतात विविध शासकीय भरती, प्रवेश परीक्षा आणि बोर्ड परीक्षांमध्ये अनेक वेळा पेपरफुटी आणि महाघोटाळा उघड झाले आहेत. यामुळे अनेक परीक्षा रद्द कराव्या लागल्या नाहीत का?
यामुळे कोट्यावधी विद्यार्थ्यांना मनस्ताप, आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहेत. आणि शेवटी CBI,SIT, न्यायालयीन चौकश्या लावण्याची मोठी नामुष्की सरकारवर आली नाही का? एका अधिकृत विश्लेषणानुसार भारतामध्ये 2019 -24 या केवळ 5 वर्षाच्या कालावधीत किमान 65 पेक्षा जास्त पेपरफुटीच्या मोठ्या घटना नोंदविल्या गेल्या आहेत. हा देशभरातील विद्यार्थांच्या भविष्याशी चाललेला क्रूर खेळ नाही का?
हे केंद्र सरकारचे धडधडीत अपयश नाही का? असा थेट प्रश्नही काळगे यांनी उपस्थित केला आहे. राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, केशवराज, देशिकेंद्र विदयालय आणि महात्मा गांधी महाविद्यालय अशा संस्थांनी लाखो ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. मीही याच लातूर पॅटर्नचा विदयार्थी आहे. आता या लातूर पॅटर्नला डाग लागला आहे तो यंत्रणेच्या भ्रष्टाचाराने.
या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हे खासदार म्हणून माझे कर्तव्यच आहे आणि मी ते यापुढेही करत राहीन त्याला तुम्ही 'राजकारण' म्हणत असाल तर ते दुर्दैवी आहे. तुम्ही म्हणालात की आपण सर्वांनी 'चिंतन' केले पाहिजे. पण आमदार महोदय, आता चिंतनाची वेळ निघून गेली आहे, असे आपणास वाटत नाही का? आता कठोर कृतीची गरज आहे. केंद्र आणि राज्यात तुमचे सरकार असताना सातत्याने पेपर का फुटतात? याचा आपण विचार करणार आहात का? आमदार महोदय विद्यार्थ्यांच्या आयुष्याची होणारी होरपळ थांबवण्यासाठी ठोस पावले का उचलली जात नाहीत, याचे उत्तर तुम्ही देणार आहात का?
'लातूरच्या पवित्र शैक्षणिक परंपरेला कलंकित करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाऊ नये', हीच माझी आणि काँग्रेस पक्षाची पहिल्यापासूनची भूमिका आहे. पण केंद्र सरकारच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी स्थानिक पातळीवर 'आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण' तुम्ही करू नये. ( ते लातूरच्या सभ्य राजकारणाला शोभणारे नाही.) देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या खऱ्या सुत्रधारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जी आत्तापर्यंत झाली नाही म्हणून अशी गुन्हेगारी वृत्ती वाढत चालली आहे.
माझी, माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. प्रामाणिक व होतकरू विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही, कोणी करीत असेल तर त्यालाही करू देणार नाही. वर्षानुवर्षे परीक्षेत होत असलेल्या गैरप्रकाराची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांची नाही तर कोणाची आहे तेही स्पष्ट करा, असे आवाहन खासदार काळगे यांनी अभिमन्यू पवारांना केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.