

SRPF Question Paper: देशभरात NEET पेपरफुटी प्रकरण गाजत असताना आता महाराष्ट्रात आणखी एका भरती परीक्षेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेत तब्बल 100 पैकी 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या सराव प्रश्नसंचातून जसेच्या तसे आल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे.
2 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेतील प्रश्न हे एका खासगी प्रकाशकाच्या ‘पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10’ या पुस्तकातून थेट उचलण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला.
विशेष म्हणजे पुस्तकातील तब्बल 85 प्रश्न शब्दशः प्रश्नपत्रिकेत आल्याने उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेकांनी ही भरती प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.
राज्यात आधीच विविध भरती परीक्षा आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच आता पोलीस भरतीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत असा प्रकार समोर आल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रश्नपत्रिका तयार करताना कोणतीही गोपनीयता पाळली गेली का? पेपर सेट करणाऱ्या यंत्रणेवर कोणाचे नियंत्रण होते का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे.
विरोधी पक्षांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. उमेदवारांनीही या प्रकरणामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान, वाढता वाद लक्षात घेता राज्य राखीव पोलीस दलाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 4 मे रोजी चौकशीचे आदेश दिल्यानंतर भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
अखेर अप्पर पोलीस महासंचालकांनी परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले. आता ही लेखी परीक्षा 24 मे 2026 रोजी दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी, दौंड येथे नव्याने घेतली जाणार आहे. मात्र, वारंवार समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.