

Bimla Chaudhary News: : निवडणुकीत नेतेमंडळी रस्ते, पाणी, वीज, रोजगार, विकास अशा नेहमीच्या आश्वासनांचा पाऊस पाडतात. पण हरियाणातील एका भाजप आमदारानं चक्क अविवाहित तरुणांचे संसार थाटून देण्याचीच गॅरंटी दिली आहे. त्यामुळे सध्या हरियाणाच्या राजकारणात “विकासापेक्षा विवाह” जास्त चर्चेत आला आहे.
हरियाणातील पटौदी मतदारसंघाच्या भाजप आमदार बिमला चौधरी (Bimla Chaudhary) यांनी निवडणुकीत दिलेलं एक आगळंवेगळं आश्वासन आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
“आम्हाला मतदान करा, शहराचा विकास करूच; पण जे अविवाहित आहेत त्यांची लग्नही लावून देऊ,” असं आश्वासन त्यांनी प्रचारसभेत दिलं होतं. विशेष म्हणजे निवडणुकीत त्या विजयी झाल्या.त्यानंतरक त्यांनी प्रचारात दिलेला शब्द पाळला आहे. आता खरंच “मॅरेज मिशन”वर उतरल्याचं दिसत आहे.
रेवाडी नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या विनीता पीपल यांनी विजय मिळवल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या आभार सभेत बिमला चौधरी यांना त्यांनी निवडणुकीत दिलेले मतदारांना दिलेले आश्वासन आठवले. जे अविवाहित आहेत, त्यांनी आपला बायोडाटा घेऊन माझ्याकडे यावं, त्यांच्या लग्नाची जबाबदारी माझी,” असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. त्यानंतर सभेत एकच हशा पिकला.
यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या हरियाणाच्या आरोग्यमंत्री आरती राव यांनीही संधी साधत जोरदार टोला लगावला. “इथे कुणी अविवाहित असेल तर लाजू नका, लगेच बिमलाजींकडे नाव द्या; त्या लगेच त्यांचा संसार उभा करुन देतील,” असं म्हणत त्यांनी सभेतल्या कार्यकर्त्यांनाही खळखळून हसवलं.
राजकारणात ‘फ्री वाय-फाय’, ‘फ्री वीज’, ‘फ्री गॅस’ अशा घोषणा ऐकायला मिळतात; पण ‘फ्री मॅरेज ब्युरो’ ही संकल्पना बहुधा पहिल्यांदाच चर्चेत आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी “सरकारी नोकरीनंतर आता सरकारी लग्न योजना” अशी खिल्ली उडवली, तर काहींनी “हरियाणात आता लग्नासाठीही आमदारांची शिफारस लागणार का?” असा मिश्कील सवाल केला.
विशेष म्हणजे बिमला चौधरी या हरियाणाच्या राजकारणातील चर्चित व्यक्तिमत्त्व आहेत. 2014 मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या तेव्हा त्यांनी स्वतःला “निरक्षर” असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं. मात्र 2024 च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःला दहावी उत्तीर्ण असल्याचं जाहीर करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी 2018 मध्ये मुक्त शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं सांगितलं होतं.
हरियाणाच्या राजकारणात तरुणाईचा विषय नवीन नाही. यापूर्वी भाजप नेते ओम प्रकाश धनखड यांनीही “हरियाणातील तरुणांसाठी बिहारमधून वधू आणू,” असं विधान करून मोठा वाद ओढवून घेतला होता. आता बिमला चौधरी यांच्या नव्या “बायोडाटा पॉलिटिक्स”मुळे पुन्हा एकदा हरियाणातील राजकारण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे.
सध्या तरी रेवाडीतील अनेक लग्नाळू युवक “रोजगारापेक्षा आधी लग्न” या आशेने आपले बायोडाटा तयार करत असल्याच्या मिश्कील चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.