Osmanabad Lok Sabha Constituency  Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad Lok Sabha Constituency : ओमप्रकाश राजेनिंबाळकर; जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारे खासदार

Osmanabad Political News : वडिलांची हत्या झाल्यानंतरही ओमप्रकाश राजेनिंबाळकर खंबीरपणे उभे राहिले...

Sachin Waghmare

Lok Sabha Election 2024 : शिवसेनेतील फाटाफुटीनंतर खासदारांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. उद्धव ठाकरेंसोबत सध्या जे सहा खासदार उरले आहेत, त्यात एक नाव आहे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचे. ओमराजे या नावाने लोकप्रिय असलेला हा तोच तरुण नेता आहे, ज्याला बाळासाहेबांनी वयाच्या 26 व्या वर्षी 2009 मध्ये आमदार केले होते. पुढे 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी ओमराजेंना खासदार केले.

ओमराजे खंबीरपणे ठाकरेंच्या मागे उभे राहण्याचे कारणही तसेच आहे. त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात बाळासाहेबांनी त्यांना साथ दिली आणि तू माझ्या मुलासारखा आहेस, असा शब्द दिला. वडिलांची हत्या झाल्यानंतरही ओमराजे खंबीरपणे उभे राहिले आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या धाराशिवमध्ये पक्ष वाढवण्यासाठी हातभार लावला. जनतेच्या कामासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक जाहीर करणारा देशातील पहिला खासदार अशी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची ख्याती आहे.

धाराशिवमधील राजेनिंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा वारसा पुढे नेणारे ओमराजे हे सातत्याने चर्चेत असतात. त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय असतो. ग्रामीण शैलीतील खुमासदार वक्तृत्वशैली व त्यांच्या तडाखेबंद भाषणामुळे युवा पिढीत त्यांची मोठी क्रेझ आहे. गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. धाराशिवचे आमदार कैलास पाटील हेही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून या दोघांनाही मतदारांची सहानुभूती मिळत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातून शिवसेनेकडून ओम राजेनिंबाळकर यांचे समर्थक कैलास पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी ओम राजेनिंबाळकर यांनी बाईकवरून गावोगावी फिरून प्रचार केला होता.

सर्वात कमी वयात ओमराजे आमदार झाले. ते धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. युवासेनेचे राज्य सचिव म्हणून संघटनात्मक कामात त्यांनी छाप उमटवली. हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे, यासाठी घटनात्मक दुरुस्ती करावी व राज्य सरकारला ५०% पेक्षा पुढे आरक्षण देण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे कायम ठेवावे व धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी केली. धाराशिव जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय, सीना-कोळेगाव उपसा जलसिंचन, 21 टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न (या प्रश्नावरून विधानसभेत निलंबित), सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेसाठी प्रयत्न करीत लोकसभेत धाराशिवचा आवाज पोहोचवला आहे.

नाव (Name)

ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर (ओम राजेनिंबाळकर)

जन्मतारीख (Birth date)

1 जुलै 1983

शिक्षण (Education)

बीई इलेक्ट्रॉनिक्स द्वितीय वर्ष

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) :

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे वडील कै. पवन राजेनिंबाळकर हे उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. ते माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चुलतबंधू. तेरणा कारखान्याच्या माजी अध्यक्ष आनंदीदेवी राजेनिंबाळकर या त्यांच्या मातुःश्री आहेत. त्यांच्या पत्नी संयोजिनी राजेनिंबाळकर या गृहिणी असून बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असतात. त्यांचे बंधू जयप्रकाश राजेनिंबाळकर शेती व व्यवसाय पाहतात. त्यांच्या मुलाचे नाव राजवीर आणि मुलीचे नाव गायत्रीआहे. दोन्ही मुले शालेय शिक्षण घेत आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेतकरी

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

धाराशिव

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (ठाकरे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

युवासेनेचे राज्य सचिव म्हणून त्यांनी संघटनात्मक कामात राज्यभर छाप उमटवली. महाराष्ट्रातील सर्वात मोठा दोन नंबरचा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या (ढोकी, ता. धाराशिव) निवडणुकीत त्यांचे पॅनेल विजयी झाले. 2007 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता मिळवली. त्यानंतर 2009 मध्ये प्रथमच त्यांनी धाराशिव विधानसभा मतदारसंघातून कमी वयात विजय मिळवला. २०१४ मध्ये धाराशिव विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर २०१९ च्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर ते उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळे त्यांची सर्वसामान्यांत वेगळी क्रेझ आहे. लोकसभेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण समितीचे सदस्य, लोकसभेच्या हक्कभंग समितीचे सदस्य, विधी व न्याय आणि लोक कार्मिक समितीचे ते सदस्य आहेत.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

पवनराजे मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन ते करीत असतात. त्यासोबतच धारशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर गरजू नागरिकांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला. पवनराजे फाउंडेशनमार्फत कोविड सेंटर सुरू केले. धाराशिव जिल्ह्यातील हजारो रुग्णांना त्यामुळे फायदा झाला. कोविडकाळामध्ये गावभेटी देऊन नागरिकांना आधार दिला. राज्यातील दुसरा ऑक्सिजन प्लांट धाराशिव जिल्ह्यात कार्यान्वित करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम त्यांनी त्या काळात केले. ते २४ तास फोनवर उपलब्ध असतात. नागरिकांच्या अडी-अडचणींना धावून येणारे खासदार, अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. यांच्याकडे येणारी मंडळी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि प्रसंगी त्यांच्या खासगी समस्याही मांडतात. त्यामुळे नागरिकांमध्ये आपल्या हक्काचा असा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना पाच लाख 96 हजार 640 इतके मते मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 मते पडली. एक लाख 36 हजार मतांनी ओमराजे विजयी झाले होते.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी शिवसेनेत मोठी स्पर्धा होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना डावलून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून राणाजगजितसिंह पाटील मैदानात होते. प्रा. गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याचा फटका राजेनिंबाळकर यांना बसेल, असे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. प्रा. गायकवाड यांनी त्यांच्याविरोधात प्रचारही केला होता, असे सांगितले जाते. मात्र त्याचा काहीच फरक पडला नाही.

शिवसेनेचे संघटनकौशल्य आणि भाजपसोबत असलेल्या युतीचा फायदा राजेनिंबाळकर यांना मिळाला. त्यांनी चुलतबंधू, राष्ट्रवादी काँग्रेसचे राणाजगजितसिंह पाटील यांचा सव्वा लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले. या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासाठी त्यांना धाराशिव या हक्काच्या विधानसभा मतदारसंघावर पाणी सोडावे लागले होते.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा मतदारसंघात तगडा जनसंपर्क आहे. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा अशी त्यांची प्रतिमा आहे. रात्रंदिवस मोबाइल सुरू असतो. या जनसंपर्काचा त्यांना मोठा फायदा झाला आहे. सतत काम करीत असल्याने व प्रत्येकाच्या सुख व दुःखात धावून येणारा खासदार अशी त्यांची ओळख आहे. त्यांना एकदा रात्री त्यांना ट्रकचालकाचा फोन केला होता. त्यांनी त्याची अडचण कशी दूर केली, याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. मतदारसंघातील विकासकामांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ते नियमित बैठका घेतात. मतदारसंघातील विविध सहकारी संस्थांच्या कारभाराचा नियमित आढावा ते घेतात. विवाह समारंभ, खासगी गाठी-भेटी, अंत्यसंस्कार, दशक्रिया आदी कार्यक्रमांना हजेरी लावण्यावर त्यांचा अनेक वर्षांपासूनचा पायंडा त्यांनी जपला आहे. गरजू रुग्णांना मदतीसाठी धार्मिक संस्था, मुख्यमंत्री निधीसह केंद्र शासनाच्या योजनांतून लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. नेहमी युवकांच्या गराड्यात ते असतात. मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना नावानिशी ओळखतात. जवळच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आठवणीने फोन करून वाढदिवसाला शुभेच्छा न विसरता देतात. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्याविषयी आत्मीयता वाटते.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. राजेनिंबाळकर यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जनसंपर्क वाढवण्यावर भर असतो. विशेष म्हणजे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवली जातात. त्याशिवाय पक्षाची ध्येयधोरणे, भाषणे, मेळावे याची माहिती ते सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवरून कार्यकर्त्यांना देत असतात. याशिवाय धाराशिव मतदारसंघातील पक्षीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यांची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात येतात. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्याशी त्यांची वैयक्तिक ओळख आहे. मतदारसंघातील तरुणाई व नागरिकांशी असलेले मजबूत संबंध याचा त्यांना सार्वजनिक क्षेत्रात काम करताना फायदा होतो.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

खोके, पेट्या लाथाडून आम्ही निष्ठेने पक्षाबरोबर राहिलो, कारण गद्दारी आमच्या रक्तात नाही. मात्र जे गद्दारी करून गेले, ज्यांनी राज्याचे सर्वोच्च पद मिळवले, त्यांना आपल्या फेसबुकचा कमेंट बॉक्स बंद करून ठेवावा लागला आहे. अशा मुख्यमंत्रिपदाचा उपयोग काय? अशी टीका त्यांनी केली होती. भगवान के घर देर हे, अंधेर नहीं, अशा शब्दांत त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर विधासनभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर भाष्य केले. निकाल काही लागू द्या, खरा निकाल जनतेच्या न्यायालयातच लागेल. निवडणुकीत जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

बाळासाहेब ठाकरे, वडील कै. पवन राजेनिंबाळकर

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गासाठी ओमराजे यांनी प्रयत्न केले. कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्यामध्ये योगदान, बार्शी येथील न्यायालयाच्या इमारतीसाठी 76 कोटी निधी रुपयांचा मंजूर करण्यामध्ये योगदान, शहरातील भूमिगत गटार योजना मंजूर करुन काम सुरू करण्यामध्येही त्यांचे योगदान आहे. शेतकऱ्यांना पीकविमा (2020, 2021 व 2022) मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समृद्ध जीवन, पर्ल्ससारख्या विविध योजनांमध्ये अडकलेले नागरिकांचे पैसे परत मिळावेत, यासाठी त्यांनी लोकसभेत वेळोवेळी आवाज उठवला. त्यासोबतच वृद्ध, निराधार, व अपंगांचे अर्थसाह्य एक हजार रुपयांवरून पाच हजार रुपये करण्याची मागणी त्यांनी लोकसभेत केली.

दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक व्हेईकलचे मोफत वाटप, अनेक होतकरू विद्यार्थी व खेळाडूंचे पालकत्व, सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर जिल्ह्यातून वळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बार्शी-तुळजापूर-अक्कलकोट महामार्गासाठीही प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी वारंवार लोकसभेत आवाज उठवला. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी मराठा, लिंगायत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत उठवला होता. या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यासोबतच ईपीएस 95 संदर्भात लोकसभेत आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला सूचना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीची प्राधान्यक्रम अट रद्द केली. शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली भुयारी गटारी मार्ग (208.75 कोटी) तसेच 50 वर्षांनंतर वाढती लोकसंख्या गृहीत धरून उजनी धरणातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढविले. धाराशिव जिल्ह्यात व शहरात रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला. महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक विकासकामांना स्थगिती दिली. त्यामुळे महावितरणचे ट्रान्स्फॉर्मर बसवण्याची कामे थांबली. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ आठ तास वीज मिळत आहे, या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदा निवडणूक होत आहे. गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा हा मतदारसंघ बालेकिल्ला राहिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने केली आहे. भाजपने मोदी सरकारच्या योजना मतदारसंघांतील नागरिकापर्यंत पोहोचवत विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. धाराशिव मतदारसंघात भाजपकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील, बसवराज मंगरूळे, संताजी चालुक्य, शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) कडून प्रा. सुरेश बिराजदार यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. ऐनवेळी महायुतीकडून तगडा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता. उमेदवार कोण असणार, यावर विजयाचे समीकरण अवलंबून असेल. धाराशिव जिल्ह्यातील बंद पडलेले साखर कारखाने, सहकारी संस्था, सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्ग, २१ टीएमसी पाणी, कायम दुष्काळ या मुद्यांवरून अडचणीत भर पडण्याची शक्यता.

मतदारसंघातील काही भागांत विकासकामे झाली नसल्यामुळे काहीशी नाराजी असून त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवणार आहे. त्यामुळे येथील टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांच्या नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या बूथवाईज प्रचार यंत्रणेचा ओमराजेंना मोठा फायदा झाला होता. यावेळेस स्वतःची प्रचारयंत्रणा राबवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिवसेना कार्यकर्त्यांत आलेली मरगळ दूर करून कामाला लावावे लागणार आहे. येत्या काळात महाविकास आघाडी एकसंध ठेवण्याचे आव्हानही आहे. काँग्रेस व राष्ट्र्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ खासदारांपैकी एक अशी ओळख असल्याने (ठाकरे गट) शिवसेनेकडे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशिवाय दुसरा तुल्यबळ उमेदवार सध्या तरी दिसत नाही. त्यांनी केलेल्या कामांची संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी न दिल्यास या जागेवर शिवसेनेची (ठाकरे गट) अडचण होऊ शकते. पक्षाने जर राजेनिंबाळकर यांना जर उमेदवारी दिली नाही तरी ते पक्षाविरोधात बंडखोरी करण्याची सूतरामही शक्यता नाही. पक्षाने जर या ठिकाणी दुसरा उमेदवार दिला तर ते पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करतील.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT