Madha Lok Sabha Constituency: दिग्गजांना भिडणारा नेता रणजितसिंह नाईक-निंबाळकर

Madha Political News : धैर्यशील मोहिते-पाटीलच रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याने निंबाळकरांना उमेदवारी मिळवण्यासाठी थोडासा पेच निर्माण झाला आहे.
Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत माढा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवत फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या अभेद्य समजल्या जाणाऱ्या या गडावर कमळाचे निशाण फडकावले होते. आक्रमक वक्त्तृत्वशैली, मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना ओळखले जातात.

मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी थेट बारामतीशी दोन हात करायला मागे पुढे न पाहणाऱ्या निंबाळकरांनी भाजपमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. पवारांना नडणारा नेता म्हणून दिल्लीतही त्यांची विशेष दखल घेतली जात आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून माढा लोकसभेसाठी रणजितसिंह निंबाळकर यांच्याच नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघातील परिस्थिती काहीशी बदलली आहे. 2019 च्या निवडणुकीत किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या मोहिते-पाटील घराण्यातील भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तत्कालीन परिस्थितीत अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याची साथ मिळाल्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, आता मोहिते-पाटीलच रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याने निंबाळकरांना उमेदवारी मिळवण्यासाठी थोडासा पेच निर्माण झाला आहे.

असे असतानाही आपल्या कामाच्या बळावर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी मतदारसंघात बेरजेचे राजकारण करीत मोहिते-पाटलांच्या विरोधकांची मोट बांधली आहे. यामध्ये माढ्याचे शिंदेबंधू, करमाळ्यातील बागल गटाचा पाठिंबा मिळवण्यात नाईक-निंबाळकर यशस्वी ठरले आहेत. विशेष म्हणजे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी गेल्या लोकसभेला नाईक-निंबाळकरांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. आता त्याच शिंदेबंधूंनी नाईक-निंबाळकरांना पुन्हा एकदा खासदार करण्याचा निर्धार केला आहे.

नाव (Name)

रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर

जन्मतारीख (Birth date)

19 फेब्रुवारी 1977

शिक्षण (Education)

12 वी उत्तीर्ण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून डिप्लोमा

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकीयच आहे. रणजितसिंह यांचे वडील हिंदूराव नाईक-निंबाळकर हे 1996 मध्ये शिवसेनेकडून साताऱ्याचे खासदार होते. मार्च 2022 मध्ये त्यांचे निधन झाले. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला नाईक-निंबाळकर यादेखील राजकारणात सक्रिय आहेत. त्या सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांच्या मातोश्रींचे नाव मंदाकिनी निंबाळकर असे आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ताराराजे आणि इंदिराराजे या दोन मुली आहेत. नाईक-निंबाळकरांची वडिलोपार्जित आर्थिक सुबत्ता आहे. समशेरबहाद्दर नाईक-निंबाळकर हे त्यांचे बंधू असून ते फलटण नगरपरिषदेत विरोधी पक्षनेते होते. दरम्यान, नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबाने तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Ranjitsinh Naik Nimbalkar
उदयनराजे नकोसे? साताऱ्याचा पुढचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व्हावेत...

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

रणजितसिंह निंबाळकर हे राजकारणी आणि एक यशस्वी व्यावसायिकदेखील आहेत. साखर कारखाना, स्वराज्य दूध संघ, स्वराज्य इंडिया उद्योगसमूह असे त्यांचे विविध उद्योग, व्यवसाय आहेत.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

माढा

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

माढ्याचे खासदार असलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा राजकारणात सक्रिय सहभाग असला तरी त्यांनी प्रत्यक्षात दोनच निवडणुका लढवल्या आहेत. वडील हिंदुराव निंबाळकर हे खासदार होते. त्यामुळे रणजितसिंह यांनी सातारा जिल्ह्याच्या आणि फलटणच्या राजकारणात आपला गट निर्माण केला होता. त्या माध्यमातून त्यांनी स्थानिक संस्थांवर आपल्या गटाचे वर्चस्व निर्माण केले होते. दरम्यान, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यापूर्वी 2004 मध्ये फलटण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत रणजितसिंह यांना राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत रणजिसिंह निंबाळकरांना 42051 मते मिळाली होती, तर रामराजे नाईक-निंबाळकर हे 82996 मते घेऊन विजयी झाले होते.

पुढे रणजितसिंह निंबाळकर यांचे कुटुंब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये सहभागी झाले. पृथ्वीराज चव्हाण आणि निंबाळकर यांचे संबंध अधिक घट्ट होते. त्यामुळे चव्हाण यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तसेच कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले होते. मात्र, माढा लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या रणजितसिंह निंबाळकरांनी जिल्हाध्यक्षपदाचे सत्कार समारंभ होत असतानाच काँग्रेसला हात दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला आणि योगायोगाने मोहिते-पाटलांनी दावा न केल्याने निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही निवडून आलेले रणजितसिंह 2019 च्या निवडणुकीत थेट खासदार म्हणून विजयी झाले. मात्र, त्यावेळी त्यांच्या विजयात तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि मोहिते पाटलांचा पाठिंबा या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या होत्या. दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी मात्र या मतदारसंघातून मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते यांनीच भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे खासदार निंबाळकरांनीदेखील आपले तिकीट पक्के करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मोहिते-पाटलांचा त्यांना होणारा विरोध लक्षात घेत त्यांनी यापूर्वीच मोहिते-पाटलांच्या विरोधकांची मोट बांधून डावपेच खेळले आहेत.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

रणजितसिंह निंबाळकर यांचे संपूर्ण कुटुंबच राजकारणात सक्रिय असल्याने त्यांचा जनतेशी नित्याचा संपर्क आहे. त्यातच खासदार म्हणून निंबाळकर यांच्या कार्याचा विस्तार वाढला आहे. माढा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल अथवा सातारा जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्याचा मुद्दा असेल खासदार निंबाळकर यांनी या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव हे दुष्काळी तालुके असल्याने त्यांनी या भागात पाणी पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये टैंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजना असेल, नीरा देवघरचे पाणी नियमबाह्यपणे डाव्या कालव्यातून बारामतीला जात होते ते पाणी त्यांनी उजव्या कालव्याच्या माध्यमातून फलटणच्या शिवारात खेळवले. तसेच निरा देवघरच्या सिंचनाच्या कामासाठी निधीची प्रशासकीय मान्यता मिळवली आहे. याच बरोबर कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस गती देण्याचे काम त्यांनी केली. मतदारसंघातील रेल्वेचे प्रश्न मार्गी लावत रखडलेल्या कामांना गती दिली. यामध्ये फलटण -पंढरपूर रेल्वेमार्गाच्या कामाचाही समावेश आहे. याचसोबत दुष्काळी तालुक्यीत जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले आहे. कोरोनाकाळातही मतदारसंघातील जनतेला आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वराज्य उद्योगसमूहाची यंत्रणा कामाला लावली होती. याशिवाय मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेत मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळी ते माढ्यातून निवडणूक लढण्यसाठी इच्छुक होते. मात्र, माढ्याची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने आणि भाजपकडे तगडा उमेदवार नसल्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारीही मिळवली होती. सुरुवातीला या मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र, सोशल मीडियावर माढा आणि शरद पवारांना पाडा अशा घोषणा उमेदवारी जाहीर होण्याआधीच फिरू लागल्याने हवेचा अंदाज घेत पवारांनी येथून माघार घेतली आणि माढ्याच्या संजय शिंदे यांना तिकीट दिले. माढा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र या किल्ल्याचे गडकरी मोहिते पाटील घराणेच भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकरांसाठी ही निवडणूक सोपी गेली. मोहिते पाटलांनी निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणले. यामध्ये राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा दारूण पराभव झाला होता.

रणजितसिंह निंबाळकर यांना 5,86,314 मते मिळाली, तर संजय शिंदे यांना 5,00,550 इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयाचे मुख्य कारण हे मोहिते-पाटील कुटुंबाची ताकद होती. मोहिते-पाटील कुटुंबाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यासाठी संपूर्ण मोहिते-पाटील कुटुंबाने प्रचारात आघाडी घेत निंबाळकर यांना विजय करून किंगमेकरची भूमिका पार पाडली होती. दुसरीकडे मोहिते पाटील आणि संजय शिंदे हे कट्टर विरोधक असल्याने मोहिते-पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. थोडक्यात ही निवडणूक निंबाळकर घराण्याऐवजी मोहिते-पाटील घराण्यासाठीच प्रतिष्ठेची झाली होती. त्याचाच फायदा रणजितसिंह निंबाळकरांना झाला आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिला विजय मिळवत निंबाळकर खासदार म्हणून निवडून आले.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

स्वराज दूध संघ आणि हिंदूराव नाईक निंबाळकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. याशिवाय फलटण पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदेतही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा गटाचे वर्चस्व दिसून येते. त्यामुळे मतदारसंघातील त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मोहिते-पाटील यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली. मोहिते-पाटील यांची पुढची पावले ओळखून रणजितसिंह निंबाळकर यांनी माढा मतदारसंघातील आपला जनसंपर्क अधिक वाढवण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसह विकासकामांना निधी देत मतदारांची मने जिंकण्याचे काम सुरू केले. माढा मतदारसंघ हा बहुतांश दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जनतेच्या पाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देत रणजितसिंह निंबाळकर यांनी मतदारसंघात आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणे, मतदारसंघातील जनतेची कामे मार्गी लावणे यावर त्यांनी प्रामुख्याने भर दिला आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

खासदार रणजितसिंह निंबाळकर हे सुशिक्षित राजकारणी असून सोशल मीडियाचा ते प्रभावीपणे वापर करत आहेत. माढा मतदारसंघात केलेल्या कामांची प्रसिद्धी, तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती ते आपल्या ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया हॅण्डलवरून ते प्रसिद्ध करतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर हे एक आक्रमक राजकारणी म्हणून ओळखले जातात. विरोधकांचा ते नेहमीच आक्रमक शैलीत समाचार घेताना दिसून येतात. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. दरम्यान, खासदार निंबाळकर यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका करीत असताना खालच्या पातळीवरचे वादग्रस्त विधान केले होते. मीच खरा नाईक-निंबाळकर असल्याचे सांगत रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका त्यांनी 2019 ला खासदार झाल्यानंतर विजयी सभेमध्ये केली होती. रामराजे लाचार, ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलेले व्यक्तिमत्त्व असल्याची टीका त्यांनी केली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

वडील हिंदुराव निंबाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

माढा लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नेतृत्व केलेल्या या मतदारसंघात भाजपचे निशाण फडकावण्याचे काम रणजिसिंह निंबाळकर यांनी केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे भाजपचे जिल्हा संघटक असलेल्या अकलूजच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार करत विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघात केलेली कामे आणि पक्ष नेतृत्वाने त्यांच्या उमेदवारीबाबत केलेले सूचक वक्तव्ये ही निंबाळकर यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. तसेच पहिल्याच निवडणुकीत खासदार झालेल्या रणजितसिंह निंबाळकर यांनी मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यावर आणि आपला जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला. त्यामुळे मतदारसंघात आणि दिल्ली दरबारातही त्यांची एक चांगली इमेज तयार झाली आहे. यामुळे त्यांना केंद्रीय गृह, टेलिफोन, रेल्वे आणि अन्य महत्त्वाच्या समित्यांवर काम करण्याची संधीही मिळाली आहे.

Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjit Naik-Nimbalkar on Ujjani Dam : 'पुण्याचं दुषित पाणी विठ्ठल भक्तांना मुखात घ्यावं लागतं!'

याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते-पाटील यांचे घराणे सोडल्यास माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, माण-खटाव येथील कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात निंबाळकर यशस्वी ठरताना दिसून येत आहेत. मोहिते-पाटील यांच्याकडून निवडणुकीची तयारी सुरू होताच निंबाळकरांनीदेखील त्यांच्या विरोधकांना बळ देत त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात बाजी मारली आहे. माढ्याचे शिंदेबंधू, करमाळ्याचा बागल गट, सांगोल्याचे शहाजी पाटील, माण-खटावचे जयकुमार गोरे यांचा निंबाळकरांना पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत केलेल्या कामांच्या जोरावर आणि बेरजेच्या राजकारणावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निंबाळकर यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

रणजितसिंह निंबाळकर हे पहिल्याच निवडणुकीत खासदार झाले. मात्र, त्यावेळी त्यांच्यासाठी मोहिते पाटील घराण्याने मोठी ताकद खर्च केली होती. आगामी निवडणुकीत धैर्यशील मोहिते-पाटील हे स्वत:च निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक निंबाळकर यांच्यासाठी तिकीट मिळवण्यापासून संघर्षाची राहणार आहे. निंबाळकर यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर वेळोवेळी खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळेदेखील फलटणमध्ये रामराजे यांच्या गटाकडून मोठा प्रतिकार केला जाऊ शकतो. रामराजे निंबाळकर यांनी नुकतीच मोहिते पाटील यांची भेटही घेतली होती. सध्या रणजितसिंह निंबाळकर यांनी मोहिते-पाटलांना बेदखल करून निवडणुकीची तयारी केली आहे. मात्र, मोहिते पाटलांना मानणारा मोठा मतदार माढा मतदारसंघात आहे. गेल्या निवडणुकीत मोहिते-पाटलांनी माळशिरसमधून लाखांपेक्षा जास्त मते निंबाळकरांच्या पारड्यात टाकली होती. त्यामुळे मोहिते पाटलांचा विरोध निंबाळकरांसाठी अडचणीचा ठरणारा आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर हेच या मतदारसंघातून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तशी सूचक विधानेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहेत. दुसरीकडे, मोहिते-पाटील गटानेदेखील आमचं ठरलंय, म्हणत धैर्यशील मोहिते-पाटील यांचा या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळे या जागेवरून सध्या भाजप पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. पंरतु, राजकीय समीकरणे पाहता सध्या रणजितसिंह निंबाळकर यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. यातूनही भाजपने तिकीट नाकारल्यास रणजितसिंह निंबाळकर हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

(Edited By Roshan More)

Ranjitsinh Naik Nimbalkar
Madha Loksabha : बावनकुळेंच्या संकेतानंतरही मोहिते पाटील ‘प्रचंड आशावादी’; धैर्यशील म्हणतात, भाजपचे तिकीट 100 टक्के मिळणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com