Omprakash Rajenimbalkar: इच्छुकांची गर्दी, ओमराजे मात्र 'रिलॅक्स'

Thackeray group News: उद्धव ठाकरे यांच्याप्रती जनतेत असलेल्या सहानुभूतीवर नौका पार होईल का?
Omprakas Rajmimbalkar
Omprakas RajmimbalkarSarkarnama

Dharashiv News: लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. काही इच्छुकांनी संपर्कासाठी दौरेही सुरू केले आहेत. काहीजणांनी पक्षश्रेष्ठींकडे वजन वापरायला सुरूवात केली आहे. महायुतीत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे.

शिवसेनेचे (ठाकरे गट) ओमप्रकाश राजेनिंबाळकर धाराशिवचे खासदार आहेत. या धामधुमीत ते मात्र निश्चिंत दिसत आहेत. उमेदवारी मिळावी, यासाठी जे करावे लागते ते करताना ते दिसत नाहीत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारही, असे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

विरोधक काय करतात, कशाप्रकारे तयारी करतात, याच्याशी आपल्याला काहीही देणेघेणे नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. उमेदवारांसाठी विरोधकांमध्ये असलेली स्पर्धा आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रती लोकांमध्ये असलेल्या सहानुभूतीच्या बळावर आपली नौका पार होईल, असा विश्वास खासदार राजेनिंबाळकर यांच्या बोलण्यातून दिसून आला.

Omprakas Rajmimbalkar
Maratha Vs OBC: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भुजबळ देणार जरांगेंना प्रतिउत्तर; तेजस्वी यादवांनाही निमंत्रण...

खासदार राजेनिंबाळकर यांचे वडील कै. पवन राजेनिंबाळकर हे उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. ते माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चुलत बंधू. जिल्हा बँकेतील रोखे गैरव्यवहार प्रकरणानंतर डॉ. पद्मसिंह पाटील आणि पवन राजेनिंबाळकर यांच्यात वितुष्ट आले. त्यातून २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पवन राजेनिंबाळकर यांनी डॉ.पाटील यांना आव्हान दिले. अटीतटीच्या लढतीत डॉ. पाटील यांचा विजय झाला. पवन राजेनिंबाळकर यांचा खून झाल्यानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

२००९ मध्ये त्यांनी धाराशिव (आधीचा उस्मानाबाद) विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांनी राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी राजेनिंबाळकर यांचा पराभव केला. त्यावेळचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना डावलून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून राणाजगतिसिंह पाटील मैदानात होते. प्रा. गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याचा फटका राजेनिंबाळकर यांना बसेल, असे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. मात्र संघटन कौशल्य आणि भाजपसोबत युती असल्याचा फायदा राजेनिंबाळकर यांना मिळाला आणि त्यांनी पाटील यांना पराभूत केले. राणाजगजितसिंह पाटील हे आता तुळजापूरचे आमदार असून, २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती.

गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. धाराशिवचे आमदार कैलास पाटील हेही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून या दोघांनाही मतदारांची सहानुभूती मिळाली. ती शेवटपर्यंत टिकेल किंवा नाही, हे महत्वाचे ठरणार आहे. धाराशिव मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी महायुतीतील पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. खासदार राजेनिंबाळकर यांच्या पक्षात धाराशिव मतदारसंघात उमेदवारीसाठी स्पर्धा नाही. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे.

Edited by: Mangesh Mahale

Omprakas Rajmimbalkar
Manoj Jarange: भुजबळांनी माझा धसका घेतलाय, सध्या झोपेतही ते बरळतात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com